नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आहेत. सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात दोन गटाकडून आंदोलन करण्यात आलं होतं, यानंतर संध्याकाळी दोन गट आमने-सामने आले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. संतप्त जमावाने दगडफेक करत काही वाहनांची तोडफोडही करून जाळपोळ केली. महाल परिसरामध्ये तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्याच सांगण्यात आलंय. दोन गटांमधील दगडफेकीत काही पोलीस जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. तर कुणीही कायदा हात घेऊन नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नागपूर पोलिसांनी केलंय. त्यासोबत झी 24 तासनेही नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केलंय.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांततेचे आवाहन केलंय. नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्देवी असून, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नागपूर हे शांतता आणि सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे. या शहरात जात-पंथ-धर्म या विषयावरून वाद किंवा भांडणे होत नाहीत. आज जे काही घडले, त्यासंबंधी प्रशासन कार्यवाही करेलच. नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता प्रस्थापित होईल यासाठी स्वतः देखील प्रयत्न करावेत, असे गडकरी यांनी म्हटलं आहे.