महायुतीच्या मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब, नागपुरात शपथविधीची लगबग

1991नंतर पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपुरात तयारीची लगबग सुरू झालीये. 

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 14, 2024, 08:46 PM IST
महायुतीच्या मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब, नागपुरात शपथविधीची लगबग title=

Nagpur Winter Session : मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिले आहेत. नागपूरच्या राजभवनात फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. 15 डिसेंबरला दुपारी 4च्या सुमारास शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती आहे. 1991नंतर पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.  1991मध्ये तत्कालीन राज्यपाल सी सुब्रमण्यम यांनी छगन भुजबळ आणि इतर आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली होती. 

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरच्या राजभवनातील हिरवळीवर नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.. त्यामुळे जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे.

फडणवीसांची नागपुरात भव्य स्वागत रॅली 

एकीकडे राजभवनात तयारीला वेग आला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठीही नागपूरकर सज्ज झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं रविवारी पहिल्यांदाच नागपुरात आगमन होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. नागपूर विमानतळ ते देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठमधील निवासस्थानापर्यंत स्वागत रॅली काढली जाणार आहे. सुमारे 6 ते 7 किलोमीटरच्या या मार्गवर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

शपथविधीसाठी नागपुरात जोरदार तयारी

आता महायुतीच्या मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवण्यात आल्याचंही समजतंय. सामाजिक, राजकीय आणि प्रादेशिक संतुलन राखण्याचं महायुतीसमोर आव्हान असणार आहे. मराठा-ओबीसी आणि मागासवर्गीयांना सामावून घेण्याचं मोठं आव्हानही महायुतीसमोर असणार आहे. 

फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी नागपुरात जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी या सोहळ्याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.