CM Devendra Fadnavis On Nagpur Violence: नागपूरमध्ये सोमवारी सायंकाळी दोन गटात झालेल्या हिंसेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांततेचे आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत असल्याचं म्हटलं आहे. तसेच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
"नागपूरमधील महल परिसरामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण झाली ते फारच निषेधार्ह आहे. काही लोकांनी दगडफेक केली. अगदी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. हे फारच चुकीचे आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. मी पोलीस आयुक्तांना कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक ती सर्व कठोर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. जर कोणी पोलिसांवर दगडफेक करत असेल किंवा समाजामध्ये तणाव निर्माण करत असेल तर अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूरमध्ये शांतता राखण्याचं मी आवाहन करतो. तसेच नागपूरची शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणी जाणूनबुजून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल," असा इशाराच फडणवीसांनी दिला आहे.
#WATCH | Nagpur (Maharashtra) violence: Maharashtra CM Devendra Fadnavis says, "The manner in which the situation became tense in Mahal area of Nagpur is highly condemnable. A few people pelted stones, even at the Police. This is wrong. I am keeping an eye on the situation. I… pic.twitter.com/nBUqPv7D5U
— ANI (@ANI) March 17, 2025
नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडताच चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाची बैठक पार पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रशेखर बावनकुळे 18 मार्चच्या सकाळीच नागपूरच्या दिशेने तत्काळ रवाना होणार आहेत. बावनकुळे यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील अन्य आमदारही 18 मार्च रोजी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. या घटनेत झालेल्या वित्तीय नुकसानीसह शासकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा आढावादेखील 18 मार्च रोजी घेतला जाईल.
नागपुरच्या महाल परिसरात दोन समुदायाचे गट आमनेसामने आल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी दगडफेक, जाळपोळही करण्यात आली. त्यात काही पोलीस जखमी झाले. रात्री उशीरा जमावाला पांगवल्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.