ऑपरेशनआधीच उंदराने कुरतडला पाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Nanded Shocking News: शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागात एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रुग्णाच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 28, 2025, 06:18 PM IST
ऑपरेशनआधीच उंदराने कुरतडला पाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

सतीश मोहिते, नांदेड, झी मीडिया : शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडले. नांदेड मधील श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला. 63 वर्षीय रमेश यन्नावार यांना मधुमेह आहे. त्यांच्या पायावरील एका शस्त्रक्रियेसाठी 20 जुलै रोजी ते रुग्णालयात भरती झाले होते. 21 जुलै च्या पहाटे साडेतीन चार दरम्यान त्यांच्या पायाला उंदीर कुरतडत होता. त्यांना अचानक जाग आल्याने उंदीर पळाला. त्यांनतरही तो उंदीर शस्त्रक्रिया विभागात फिरत होता. रुग्णाच्या नातेवाईकाने उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं काय झालं? 

63 वर्षीय रमेश यन्नावार यांना मधुमेह आहे. यामुळे त्यांना शनिवारी नांदेड शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. पहिल्या दिवशी रुग्णावर आयसीयू विभागात उपचार करण्यात आले. त्यानंतर पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाला सर्जरी विभागात वॉर्ड नंबर 28 मध्ये दाखल केलं. रात्री झोपेत असताना रुग्णाच्या शरीरावर उंदरानं चावा घेतला. ही बाब रुग्ण आणि कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी उंदराला हाकललं. मात्र, तोपर्यंत रुग्णाच्या पायाला जखमा झाल्या होत्या, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. या घटनेमुळं रुग्णासह नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

कारवाईची मागणी 

शासकीय रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यावर नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद बोनढारकर रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता पाहून बोनढारकर यांनी धारेवर धरले. या घटणेबाबत बैठक घेउन दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आमदार बोनढारकर म्हणाले. 

रुग्णालयाने काय दिलं उत्तर? 

शस्त्रक्रिया विभागातील या घटनेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक संजय पेरके यांच्याशी झी 24 तासने संपर्क केला. त्यांनी याबाबत कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. उंदराना पकडण्यासाठी ट्रॅप लावण्यात आल्याचे पेरके म्हणाले. शस्त्रक्रिया विभागात उंदराने रुग्णाला चावा घेणे हा गंभीर प्रकार आहे. पण जिल्हा शल्य चिकित्सकांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. उंदराने रुग्णाच्या पायाला कुरतडल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची अभ्रू वेशीला टांगल्या गेली आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More