'मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी..', राऊतांच्या 'त्या' मागणीवरुन मनसेचा टोला; म्हणाले, 'तुम्ही स्वातंत्र्य सैनिक म्हणून..'

Narkatla Swarg Book Launch: तुरुंगात असताना आलेले अनुभव राऊत यांनी पुस्तकातून मांडले असून याच पुस्तकात त्यांनी राज ठाकरेंबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्यावर आता मनसेनं पहिली प्रतिक्रिया नोंदवलीये.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 17, 2025, 08:27 AM IST
'मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी..', राऊतांच्या 'त्या' मागणीवरुन मनसेचा टोला; म्हणाले, 'तुम्ही स्वातंत्र्य सैनिक म्हणून..'
राऊतांना मनसेचे टोला

Narkatla Swarg Book Sanjay Raut Vs Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांच्या उपस्थितत या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. त्यापूर्वीच हे पुस्तक चर्चेत असून राऊत यांनी या पुस्तकातून काही गौप्यस्फोट केले आहेत. राऊत यांनी या पुस्तकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दलची एक खंत बोलून दाखवली आहे. राऊत यांनी राज ठाकरेंबद्दल या पुस्तकात व्यक्त केलेल्या नाराजीवर आता मनसेनं पुस्तक प्रकाशित होण्याआधी पहिली प्रतिक्रियाही नोंदवली आहे.

चांगले मित्र ते राजकीय विरोधक

संजय राऊत यांनी राज ठाकरेंबद्दल त्यांच्या मनातील एक सल बोलून दाखवताना, तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असं म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या विधानावर आता राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच मनसेकडून या विधानावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राज आणि राऊत यांचे आधीपासून जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र राज यांनी वेगळी राजकीय भूमिका घेत नवा पक्ष स्थापन केल्यापासून हे दोघेही राजकीय पटलावर एकमेकांचे विरोध झाले आणि वेळ पडेल तेव्हा पक्षाची बाजू मांडताना त्यांनी एकमेकांवर निशाणा साधण्यासही मागे-पुढे पाहिलं नाही. संजय राऊत यांनी मध्यंतरी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यासंदर्भातील अनुभव त्यांनी  'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून कथन केले आहेत. 

राऊत राज यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले?

याच पुस्तकामध्ये राऊत यांनी, "माझ्यावर आणि कुटुंबीयावर ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चेष्टेत म्हणाले होते, 'संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी!' खरं तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचं नात कायम राहिलं आहे. आम्ही अनेक वर्ष जवळून काम केले. सुख-दुःख वाटलं. उलट या वेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती. मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा तरी ते फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही," असं म्हणत खंत व्यक्त केली आहे.

मनसेचा राऊतांना टोला

राऊत यांनी केलेल्या या विधानावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. "संजय राऊत हे पाकिस्तानसारखे आहेत. गुन्हे करायचे आणि 'व्हिक्टीम कार्ड' खेळायचं. अरे, तुम्ही काय स्वातंत्रसैनिक म्हणून जेलमध्ये नव्हता गेलात. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेला होतात," असा टोला देशपांडेंनी राऊत यांना लगावला आहे.

आता संदीप देशापांडेंच्या टीकेला राऊत काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.