पुण्यातील 'या' ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय; मंदिरात दर्शन घेण्याची 'ती' प्रथा केली रद्द!

pune News Today:  पुण्यातील नसरापूर ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे हा निर्णय जाणून घ्या.   

मानसी क्षीरसागर | Updated: May 18, 2025, 09:01 AM IST
पुण्यातील 'या' ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय; मंदिरात दर्शन घेण्याची 'ती' प्रथा केली रद्द!
narsapur baneshwar temple dresscode decision scrap grampanchayat

pune News Today:  महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांनी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. असाच एक निर्णय पुण्यातील देवस्थानाबाबत घेण्यात आला होता. मात्र ग्रामसभेने हा निर्णय रद्द केला आहे. पुण्यातील नसरापूर ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय घेत 'शर्ट काढून मंदिरात दर्शन घेण्याची ' प्रथा रद्द केली आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. 

नसरापूर येथील प्रसिद्ध बनेश्वर महादेव मंदिरात पुरुषांनी शर्ट काढून दर्शन घेणे बंधनकारक करण्याची प्रथा अखेर ग्रामसभेच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर घेण्यात आलेला हा निर्णय लोकशाही प्रक्रियेचा सकारात्मक नमुना ठरला आहे. मंदिर ट्रस्टने काही महिन्यांपूर्वी शर्ट काढून दर्शन घेण्याचा नियम लागू केला होता. मात्र, 1 मे रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर करत याला विरोध दर्शवला होता. अर्जात नमूद करण्यात आले की, ही नव्याने सुरू झालेली प्रथा भाविकांसाठी त्रासदायक ठरते, काहीवेळा महिला भाविकांनाही अस्वस्थतेला सामोरे जावे लागते.

ग्रामसभेत या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. राजेश शामराव कदम यांनी सुचवलेला आणि प्रज्योत प्रताप कदम यांनी अनुमोदन दिलेला ठराव ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यात आला. या ठरावात स्पष्ट उल्लेख करण्यात आला की, 'भाविकांमध्ये भेदभाव न होता समान नियम लागू व्हावेत, आणि सध्याच्या सामाजिक संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर शर्ट काढण्याची अट अयोग्य आहे.' ग्रामसभा सरपंच उषा विक्रम कदम, उपसरपंच नामदेव चव्हाण आणि सर्व सदस्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यासोबतच हा ठराव धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे पाठवण्याची शिफारस करण्यात आली आहे, जेणेकरून मंदिर ट्रस्टला योग्य त्या सूचना दिल्या जातील.