Nasarapur Rape Case Primary Postpartum Report: आरोपी भीमराव कांबळेला कोर्टाने 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली असतानाच आता प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून हादरवाणारी माहिती समोर आली आहे.

Nasarapur Rape Case Primary Postpartum Report: पुण्यामधील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नसरापूर येथील पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यापूर्वी आणि खून करताना आरोपी भीमराव कांबळेने कशाप्रकारे मुलीवर अमानुष अत्याचार केला याचा खुलासा शविच्छेदनाचा प्राथमिक अहवालातून झाला आहे. काळजाचा थरकाम उडावा इतक्या अमानुषपणे भीमराव कांबळेने या मुलीचा छळ केल्याचं या अहवालामधून स्पष्ट झालं आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात शनिवारी सायंकाळी साडेतीन-चार वर्षीय पीडित चिमुकलीच्या मृतदेहाचे इन-कॅमेरा (गोपनीय) शवविच्छेदन करण्यात आले. न्यायवैद्यक विभागामध्ये ही शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली. या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मुलीच्या शरीरामधील अंतर्गत अवयवांचे नमुने फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होणार असलं तरी मुलीचा खून करण्याआधी भीमराव कांबळेने तिच्यासोबत नेमकं काय केलं याचा अंदाज या अहवालातून बांधता येत आहे.
ससून रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक अहवालातील मुख्य धक्कादायक निष्कर्षांमध्ये मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबण्यात आल्याचं उघड झालं आहे. तसेच मुलीच्या शरीरावर व्रण असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
नक्की वाचा >>
पीडित मुलीच्या तोंडात भीमराव कांबळेने पायमोजा कोंबलेल्याचं शवविच्छेदनात आढळून आलं. अत्याचारादरम्यान चिमुकलीने आरडाओरडा करू नये म्हणून आरोपीने तिच्या तोंडात मोजा कोंबला होता.
तसेच पीडित मुलीच्या छातीवर गंभीर व्रण आणि जखमा दिसून आले. आरोपीने पीडितेला निर्दयीपणे मारहाण झाल्याचे हे स्पष्ट पुरावे असल्याचं सांगितलं जात आहे. शरीरावर इतर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत. पीडितेचा मृतदेह गोठ्यामध्ये शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवलेला होता.
पीडितेच्या मृतदेहावरील शवविच्छेदन प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली होती. पंचनामा, फॉरेन्सिक टीम आणि पोलिस बंदोबस्तात ही सर्व कारवाई झाली. हा प्राथमिक अहवाल असून पीडितेच्या मृत्यूचं खरं कारण अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होईल. फॉरेन्सिक लॅब रिपोर्टनंतर पीडितेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. सध्या तरी तिचा मृत्यू गुदमरून झाला की आघाताने झाला की अन्य कारणाने हे स्पष्ट झालेलं नाही. आरोपी भीमराव कांबळेला 7 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नक्की वाचा >>
नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आज सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे. सकल हिंदू समाजाने सोलापूरकरांना हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचेचे आवाहन केले आहे. आज सकाळी दहा वाजता जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथील पूनम गेटजवळ एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना आज सोलापूरकर देखील रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळणार आहे.
भोरमधील नसरापूर गावातील ग्रामस्थ आणि माजी सरपंचांनी रविवारी रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मूळचे भोरचे असलेले शिवसेना आमदार दिलीप लांडे ही उपस्थित होते. या घटनेतील आरोपीला विशेष न्यायालय स्थापन करून महिन्याभरात फाशी देण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी आणि आमदार दिलीप लांडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याबाबत एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी ग्रामस्थानी सदर आरोपीने यापूर्वीही दोन वेळा असेच गुन्हे केले असून यावेळी तिसऱ्यांदा त्याने असे केले असल्याचे सांगितले. त्यामुळे अशा नराधमाला आता सोडल्यास पुन्हा तो कुणाचा तरी घास घेईल अशी भीती गावात निर्माण झाली असल्याचे सांगितले. दोनदा शिक्षा होऊनही अल्पावधीत सुटका झाल्याने त्याची हिम्मत वाढल्याने त्याने पुन्हा असे कृत्य केले. त्यामुळे या आरोपीवर कायमची कारवाई करावी अशी विनंती त्यांनी शिंदे यांना केली. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच योग्य असून, त्याला लवकरात फासावर चढवण्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.