सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : राखी पौर्णिमेला (Rakshan Bandhan) बहिणीची रक्षा करण्याचं वचन भाऊ बहिणीला देतो. यादिवशी  भाऊ बहिणीला भेटवस्तू देते अशी प्रथा आहे. पण नाशिक (Nashik) शहरात एका बहिणीने आपल्या एकुलत्या एक भावाला मौल्यवान भेट दिली आहे. आजाराने पिडीत भावाला बहिणीने बोनमॅरो (bonemarrow) दान करत त्याला जीवनदान दिलं आहे. रक्षाबंधनाला एका बहिणीने भावाला दिलेली यापेक्षा मोठी भेट असूच शकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक शहरात हे कुटुंब वास्तव्यास आहे. कुटुंबात आई, वडील, दोन बहिणी आणि या दोन बहिणीचा लाडका भाऊ राहतो. हा लाडका भाऊ फार्मसीचे शिक्षण घेत आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून अधून-मधून या तरुणाला थंडी-ताप, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा जाणवत होता. हा त्रास रोज होत असल्याने त्याने पालकांना ही गोष्ट सांगितली. यानंतर पालकांनी त्याची रुग्णालयात तपासणी केली. रक्ताच्या तपासण्या केल्या असता 'अप्लास्टिक अॅनेमिया' (शरीरातील बोनमॅरो अकार्यक्षम होणे) हा गंभीर आजार झाला असल्याचं निदान झालं. 


लहान बहिणीने दिला 'बोनमॅरो'
तरुणाला बोनमॅरो या गंभीर आजार झाल्याचे निदान झाल्या नंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बोनमॅरो ट्रान्सप्लांट (Bone marrow Transplant) करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सुरु झालं ते बोनमॅरो शोधण्याचं काम. लाडक्या भावाला स्टेमसेल देण्याची तयारी दोनही बहिणींनी दाखवली. यातल्या लहान बहिणीच्या मूलपेशी भावाच्या शरीराशी जुळल्या आणि लहान बहिणीची डोनर म्हणून निश्चिती झाली.


अशी झाली शस्त्रक्रिया  
तरुणाला 24 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पहिल्या सहा दिवसांत तरुणाच्या शरीरातील रक्तघटकांना केमोथेरेपी देऊन नष्ट करण्यात आलं. त्यासाठी हेपा फिल्टर्स असलेल्या अत्यंत सुरक्षित आणि नियंत्रित वातावरण असलेल्या रुममध्ये त्याला ठेवण्यात आलं. या रुममध्ये बाहेरची अशुद्ध हवा आत येत नाही. अशा वातावरणात ही सर्व प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉ. कलंत्री आणि हिमॅटोलॉजी विभागातील कुशल परिचारिकांच्या मदतीने बहिणीच्या शरीरातील स्टेमसेल्स तरुणाच्या शरीरात यशस्विपणे प्रत्यारोपित करण्यात आले. 


राखी पौर्णिमेला भावाला मिळाले गिफ्ट 
यशस्वी शस्त्रक्रिये नंतर 10 ते 12 दिवसांत तरुणाच्या शरीराने मूलपेशी स्विकारल्याचे दिसून आले. यानंतर पुढील पंधरा दिवस रुग्णाच्या विविध तपासण्यां करण्यात आल्या. रुग्णाची तब्येत स्थिर होत असल्याची खात्री डॉक्टरांना झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आलं. रक्षाबंधनाच्या तोंडावर लाडका भाऊ सुखारूप घरी आल्याने दोघंही बहिणींचा आनंद द्विगुणीत झाला होता तर भावानेही बहिणीचे आभार मानले आहे.