राज - उद्धव ठाकरेंची युती झाल्यास नाशिकचं चित्र पालटणार? काय आहे नाशिकचं राजकीय गणित?

नाशिक शहरात सध्या दोन्हीही पक्षांची ताकद पूर्णपणे संपल्यात जमा आहे. संपूर्ण प्रभागात किमान तीन नगरसेवक असणं आवश्यक आहे. मात्र तेही राहिले नसल्यामुळे कुठलाही प्रभाग आता या दोन्ही पक्षांचा राहिलेला नाही. 

नेहा चौधरी | Updated: Jul 4, 2025, 10:23 PM IST
राज - उद्धव ठाकरेंची युती झाल्यास नाशिकचं चित्र पालटणार? काय आहे नाशिकचं राजकीय गणित?

कधीकाळी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गड राहिलेलं नाशिक सध्या पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेलंय. दोन्ही पक्षांमधील बुरुज ढासळल्यानं आता या पक्षांची शहरात फारशी ताकद राहिलेली नाहीय. दोन्ही ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा मधल्या राजकीय परिस्थीतीचा आढावा घेऊयात. 

नाशिक... कधीकाळी शिवसेनेच्या प्रत्येक निवडणुकीची सुरुवात नाशिकमधून होत होती.  बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे या दोघांचंही आवडतं ठिकाण असलेलं हे शहर आता ठाकरे बंधूंच्या हातातून निसटू लागलंय. नाशिक महापालिकेच्या 2017 च्या निवडणूकत शिवसेनेचे 35 नगरसेवक निवडून आले होते. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर नाशिकमधील अनेक नगरसेवकांनी शिंदेंच्या गटात प्रवेश केला. तर काहींनी भाजपाचं कमळ हातात घेतलं. त्यामुळे ठाकरेंकडे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे नगरसेवक शिल्लक राहिले त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली. 

नाशिक महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे 35 नगरसेवक विजयी
- शिवसेनेच्या फुटीनंतर 22 नगरसेवक शिंदेंसोबत गेले
- 5 नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला
- नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेत केवळ 5 नगरसेवक शिल्लक

दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेचीही नाशिकमधील अवस्था फार चांगली नाहीय. 2012 च्या निवडणूकीत 40 नगरसेवक निवडून आणत मनसेनं सत्ता नाशिक महापालिकेवर सत्ता स्थापन केलीय. तर 2009 मध्ये मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. मात्र 2017 च्या महापालिका निवडणुकीत नाशकात मनसेची धुळधान झाली. 2017 च्या निवडणुकीत नाशिकमध्ये मनसेचे केवळ 4 नगरसेवक निवडून आले. त्यातील केवळ एक नगरसेवक आता त्यांच्याकडे शिल्लक आहे. शिंदेंच्या शिवसेनेत एका नगरसेवकाने प्रवेश केलाय. तर दोन नगरसेवकांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय. 

नाशिक शहरात सध्या दोन्हीही पक्षांची ताकद पूर्णपणे संपल्यात जमा आहे. संपूर्ण प्रभागात किमान तीन नगरसेवक असणं आवश्यक आहे. मात्र तेही राहिले नसल्यामुळे कुठलाही प्रभाग आता या दोन्ही पक्षांचा राहिलेला नाही. 

ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र आलेच तर नाशिकमध्ये दोन्ही पक्षांना नवसंजीवनी मिळणार का? शिवसेना ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाशिकातील गेलेलं वैभव परत मिळणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे.