सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर.  भगवान शंकराचं दर्शन घेण्याासाठी या मंदिरात संपूर्ण भारतातून लाखो भाविक (Devotee) येत असतात. भाविकांची वाढती गर्दी पाहाता मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी व्हीआयपी पास (VIP Pass) सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र व्हीआयपी पासमध्येही गर्दी वाढत आल्याने त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने (Trimbakeshwar Devasthan Trusts) मोठा निर्णय घेतला आहे. आता व्हीआयपी पास ऑनलाइन पद्धतीने काढता येणार आहे. यानंतरच भाविकांना दर्शन मिळेल.
 
200 रुपयांचा पास देऊन दर्शन 
दर्शनासाठी भाविकांना पाच ते सहा तास दर्शन रांगेत लागत असल्याने मंदिर प्रशासनाने व्हीआयपी पास सुविधा सुरू केली. याकरिता प्रति भाविक 200 रुपये आकारले जात आहेत. मात्र व्हीआयपी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊ लागल्याने व्हीआयपी रांगेत सुद्धा तीन ते चार लागतात. यामुळे ट्रस्टने व्हीआयपी दर्शन पास ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं करा बुकिंग
त्र्यंबकेश्वर मंदिराचे व्हीआयपी दर्शन घेण्यासाठी https://trimbakeshwartrust.com या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती भरून बुकिंग करता येणार आहे. यामध्ये तारीख आणि वेळेचे स्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. प्रतिव्यक्ती दोनशे रुपये शुल्क भरावे लागणार असून, दहा वर्षांखालील बालक, दिव्यांग भक्त तसंच 65 वर्षांवरील ज्येष्ठांना शुल्क माफ करण्यात आलं आहे. बुकिंग केलेला व्हीआयपी पास डाउनलोड करता येणार आहे. प्रत्येक भाविकासाठी स्वतंत्र क्यूआर कोड असल्याने हा व्हीआयपी पास हस्तांतरण करता येणार नाही.


तीन ठिकाणी व्यवस्था
ऑनलाईन पास मिळवण्यासाठी त्र्यंबकेश्वर शहरात तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या समोर, कुशावर्त तीर्थ आणि वाहनतळाच्या जवळ असलेले शिवप्रासाद भक्त निवास या तीन ठिकाणी व्हीआयपी पास घेता येणार आहे. त्यासाठी भक्तांना आधारकार्ड, पॅनकार्ड ओळखपत्र द्यावे लागेल. शिवाय, बायोमेट्रिक बोटांचे ठसे, चेहऱ्याचे स्कॅनिंग करावे लागणार आहे. त्यानंतर बारकोड असलेला पास देण्यात येईल. याशिवाय, भक्तनिवास रूम बुकिंग, लघुरूद्र आणि रूद्राभिषेक पूजा बुकिंगही संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.