)
शिवसेना UBTचे खासदार संजय राऊतांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. मराठवाडा आजही निजाम राजवाटीखाली आहे असा टोला लगावत त्यांनी सरकारला निजामाची उपमा दिलीये. त्य़ानंतर सत्ताधा-यांनीही राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय.
मराठवाड्यातील पूर ओसरला असला तरी पूरग्रस्तांसमोर अनेक अडचणी आहेत. वाहून गेलेला संसार पुन्हा उभं करणं आणि खरडून गेलेल्या शेतीचं नुकसान भरून काढणं शेतक-यांसाठी सोपं नाही. आता शेतक-यांना आशा आहे ती कर्जमाफीची. मात्र कर्जमाफीचा अद्याप कोणताच निर्णय झाला नाहीये. त्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारला निजाम राजवटीची उपमा दिलीये. मराठवाड्यावर आजही निजाम राजवटीप्रमाणे अत्याचार सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर उद्धव ठाकरेंच्याच काळात निजामाची राजवट होती असा पलटवार भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केलाय.
मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हंबरडा मोर्चा काढणार आहे. सरकारने धुळफेख करणारं पॅकेज जाहीर केल्याची टीका राऊतांनी केलीये तर राऊतांच्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय.
ओल्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतक-यांची जमीन पूर्णपणे खरडून गेलीये. पुढील अनेक वर्ष शेतक-याला त्या जमिनीवर शेती करता येणार नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतक-याला सावरण्याची गरज आहे. त्यामुळे सरकार कर्जमाफीबाबतचा निर्णय घेणार का? आणि घेतला तर कधी घेणार ?, असा प्रश्न पूरग्रस्तही विचारतायत.