Ajit Pawar Gets Angry: उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अजित पवारांच्या जे मनात असतं, तेच त्यांच्या चेहऱ्यावरही दिसतं. यामुळेच जर त्यांचा संताप झाला असेल तर त्यांनी तो व्यक्त नाही केलं तर नवलच. नुकतंच मंत्रालयाच्या पायऱ्यांवर सुरक्षारक्षकांना अजित पवारांच्या रागाचा सामना करावा लागला. 'काय बावळटांचा बाजार लावलाय, कुठे आहेत सगळे? मी खाली आलोय हेदेखील माहीत नाही का?', अशा शब्दांत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. नेमकं काय झालं हे जाणून घ्या.
अजित पवार मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येताच त्यांची कार आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा तयार नव्हता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कारची वाट पाहत उभं राहावं लागलं. पण कार काही केल्या येत नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवारांना असं मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभं राहिलेलं पाहून मंत्रालयातली हवशे-नवशे सेल्फी घेण्यासाठी गर्दी करू लागले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणखीनच वैतागले. यानंतर त्यांनी सर्वांसमोरच सुरक्षारक्षक आणि स्विय्य सहाय्यकांना चांगलाच दम भरला. मंत्रालय पायऱ्यावरच अजित पवारांनी रागातच 'काय बावळटांचा बाजार लावलाय, कुठे आहेत सगळे? मी खाली आलोय हेदेखील माहीत नाही का?' असं सुनावलं.
अजित पवार संतापल्यानंतर अजित पवारांचे सुरक्षारक्षक पाय लावून मंत्रालय आवारात धावाधाव करत होते. मंत्रालयात 10 मिनिटं हा प्रकार सुरु होता. पण अजित पवारांची कार काही केल्या येत नव्हती. शेवटी वैतागून उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांच्या कारमध्ये वैतागूनच बसले आणि देवगिरी बंगल्यावर रवाना झाले. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या कारमध्ये बसल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या सर्व कार्यालयीन सुरक्षा रक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली.