)
ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : निलेश घायवळवरून राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. रोहित पवारांनी घायवळ शस्त्र परवान्यावरून राम शिंदे यांच्यावर आरोप केले होते. यानंतर राम शिंदेंनी देखील रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर तिकडे धंगेकरांनी केलेल्या आरोपांनंतर चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्ते समीर पाटलांनी धंगेकरांना इशारा दिला आहे.
निलेश घायवळवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू आहे. रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी निलेश घायवळच्या शस्त्र परवान्यावरून राम शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान यानंतर आता राम शिंदेंनी देखील रोहित पवारांवर पलटवार करत मोठा आरोप केला आहे. रोहित पवारांनी निलेश घायवळला पासपोर्ट देण्यास मदत केली आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना निलेश घायवळला पासपोर्ट दिल्याचा आरोप राम शिंदेकडून करण्यात आला आहे.
राम शिंदे आणि रोहित पवार हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदेंचा दोन वेळा पराभव केला आहे. दरम्यान यावरूनही दोन्ही नेत्यांमध्ये आरोपांचा सामना पाहायला मिळाला. राम शिंदेंनी निवडणुकीमध्ये निलेश घायवळचा उपयोग केल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय तर माझ्या पराभवासाठी
रोहित पवारांनीच घायवळला कर्जत-जामखेडमध्ये आणल्याचा आरोप राम शिंदेंकडून करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे याच घायवळवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत देखील जुंपल्याचं पाहायला मिळालं आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी घायवळवरून थेट चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला होता. तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्ता समीर पाटलांवर देखील देखील त्यांनी आरोप केले होते. यानंतर आता समीर पाटलांनी धंगेकरांवर पलटवार करत इशारा दिला आहे.
आधी घायवळ शस्त्र परवाना त्यानंतर घायवळचा बनावट पासपोर्ट प्रकरण यावरूनही चांगलंच राजकारण पेटल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवारांनी राम शिंदेंवर केलेल्या आरोपांनतर आता राम शिंदे यांच्याकडूनही पलटवार करण्यात आला. तर दुसरीकडे या प्रकरणावरून धंगेकरांनी समीर पाटलांवर गंभीर आरोप केले होते. त्याला समीर पाटलांनी प्रत्युत्तर देत धंगेकरांना इशारा दिला आहे. त्यामुळे घायवळ प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद आणखीन तापण्याची शक्यता आहे.