CORONA UPDATE! राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्यात सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीमुळे दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता

Updated: Sep 20, 2021, 03:53 PM IST
CORONA UPDATE! राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती

जालना : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (Corona Third Wave) संकेत सध्यातरी नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. मात्र, सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. (There is no indication of a third wave of corona in the state)

राज्यात लसीकरणाचा वेग वाढवणार

राज्यात सध्या दररोज 13 ते 14 लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे. त्यामुळे नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं असंही टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यात दररोज 15 ते 20 लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्यात रुग्णसंख्येत चढउतार

राज्यात कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत चढ-उतार पाहिला मिळत आहेत. रविवारी राज्यात 3 हाजर 413 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर 8 हजार 326 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97.16 टक्के इतकं आहे. सध्या राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात सध्या 11 हजार 720 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

तर, राज्यात सध्या 42 हजार 955 सक्रिय रुग्णसंख्या आहे. राज्यात 2,81,561 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,752  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.