वाँटेड ओंकार हत्तीचा धुडगूस, बागायती शेती उद्ध्वस्त, ग्रामस्थ चिंतेत

काही काळ दोडामार्ग भागात वास्तव्य केलेल्या ओंकार हत्तीने गोवा आणि त्यानंतर कर्नाटक राज्यातल्या बेळगावमध्ये दहशद माजवली. पुन्हा सिंधुदुर्गाकडे आपला मोर्चा वळवलाय.

पूजा पवार | Updated: Oct 5, 2025, 10:43 PM IST
वाँटेड ओंकार हत्तीचा धुडगूस, बागायती शेती उद्ध्वस्त, ग्रामस्थ चिंतेत
(Photo Credit : Social Media)

उमेश परब (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग : एखादा आरोपी वाँटेड असतो, हे आपण अनेकदा बातम्यांमधून पाहिलंय. पण एखादा प्राणी वाँटेड आहे, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या वास्तव्याला असणारा ओंकार हत्ती तीन राज्यात वाँटेड आहे. 

Add Zee News as a Preferred Source

ओंकार, जा बाबा जा...आमचं काय चुकलं तर आम्हाला माफ कर.. अशी विनवणी ग्रामस्थ करत आहेत. नाव जरी ओंकार असलं तरी हा रानटी हत्ती आहे. आपल्या कळपातून भरकटल्यापासून तो एकटा सैरभैर झालाय आणि विध्वंस करतोय.  हत्ती आणि सिंधुदुर्ग हे समीकरण फार जुनं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग भागात नेहमीच या रानटी हत्तींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. आता पुन्हा सिंधुदुर्गात आलेल्या ओंकार हत्तीनं केवळ जंगलातच नाही तर चक्क मानवी वस्तीत दाखल होतं. सगळं उद्ध्वस्त केलंय. मध्यंतरी त्यानं एका वृद्धाला चिरडून मारल्याचीही बातमी समोर आली होती. काही काळ दोडामार्ग भागात वास्तव्य केलेल्या ओंकार हत्तीने गोवा आणि त्यानंतर कर्नाटक राज्यातल्या बेळगावमध्ये दहशद माजवली. पुन्हा सिंधुदुर्गाकडे आपला मोर्चा वळवलाय. शेतीसोबत  बागायतींचं नुकसान करणारा केवळ दहा वर्ष वय असलेला ओंकार हत्ती डोकेदुखी ठरलाय.

कोल्हापुरातल्या महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्याचा अट्टाहास करणा-या प्रशासनानं या ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठवावं, अशी मागणी आता सर्वच क्षेत्रातून होतेय. दरम्यान, ओंकार हत्तीबाबत आपण वनमंत्र्यांसोबत बैठक घेऊ आणि राज्यातल्या सर्वच हत्तींना वनतारामध्ये घेऊन जावं, अशी मागणी आपण करू असं आमदार दीपक केसरकरांनी सांगितलंय.

गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात धुडगूस घालणारा ओंकार हा वाँटेड आहे. त्यानं शेतक-यांचं मोठं नुकसान तर केलंच पण ग्रामस्थांच्या मनातही भीती बसलीय. आता त्याचा बंदोबस्त प्रशासन कधी करतंय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. 

FAQ : 

ओंकार हत्ती कोण आहे आणि तो कसा वाँटेड झाला?
उत्तर: ओंकार हा एक रानटी हत्ती आहे, जो कळपातून भरकटून एकटा सैरभैर झाला आहे. तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात विध्वंस करत असल्याने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत वाँटेड आहे. त्याने शेती, बागायती आणि मानवी वस्त्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

ओंकार हत्तीनं काय नुकसान केलं आहे?
उत्तर: ओंकार हत्तीनं शेती आणि बागायतींचं मोठं नुकसान केलं आहे. मध्यंतरी त्यानं एका वृद्ध व्यक्तीला चिरडून मारलं होतं. गोवा आणि कर्नाटकातील बेळगावमध्येही त्याने दहशत माजवली होती.

ओंकार हत्तीचं वय आणि स्वभाव कसा आहे?
उत्तर: ओंकार हत्तीचं वय सुमारे दहा वर्ष आहे. तो रानटी असल्याने विध्वंसकारी आहे आणि शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. 

About the Author