मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता. तरीही विरोधी पक्षनेत्याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची घोषणा कधी होणार? असा सवाल विरोधकांनी उपस्थित करत सरकारवर टीका केलीय. तसंच देवेंद्र फडणवीसांनी देखील विरोधी पक्षनेत्यावर भाष्य करत टोला लगावलाय.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडण्याची शक्यता आहे. विधानसभा विरोधी पक्षनेत्याचा प्रस्ताव मविआकडून विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी याबाबत कोणतीही घोषणा केली. दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत भाष्य करत विरोधकांना टोला लगावला. दरम्यान यानंतर जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या हिवाळी अधिवेशनातील भाषणातील आठवण करुन देत पलटवार केला.
मविआकडून विरोधी पक्षनेत्यासाठी भास्कर जाधव यांचं नाव देण्यात आलं आहे. दरम्यान नाव देऊन देखील भास्कर जाधवांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. यावर भास्कर जाधवांनी खंत व्यक्त करत सरकारवर शरसंधान साधलं आहे. तसंच माझ्या नावाला विरोध असेल तर दुसऱ्या नावाची घोषणा करावी अशी मागणी भास्कर जाधवांनी केली आहे.
हेही वाचा : भाडेकरुला 7 फूट खोल खड्ड्यात जिवंत गाडलं, तीन महिन्यांनी उघड झालं रहस्य; कारण ऐकून पोलीस हादरले
तर दुसरीकडे विरोधी पक्षनेता पदावरुन जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर आरोप केला आहे. सरकारला विरोधी पक्षनेता नकोत्यांना त्यांच्या मनमर्जीनं सरकार चालवायचं आहे असं म्हणत आव्हाडांनी देखील टीकास्त्र डागलं आहे. हिवाळी अधिवेशनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं देखील सूप वाजणार आहे. मात्र, अजूनही विरोधी पक्षनेत्याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत विरोधी पक्षनेत्याची घोषणा लवकरात लवकर करण्याची मागणी केलीय.