प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुण्यात निधन, वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr Jayant Narlikar passed away:  डॉ. जयंत नारळीकर हे जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचे  अल्पशा आजारामुळे निधन झाले आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: May 20, 2025, 11:50 AM IST
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुण्यात निधन, वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Noted astrophysicist Jayant Narlikar passes away (Photo Credit: Facebook/Jijo P. Ulahannan)

Science communicator and eminent astrophysicist Dr Jayant Narlikar: आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्राचे (IUCAA) संस्थापक संचालक आणि जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात मंगळवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या ८७ वर्षी अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजारामुळे त्यांचे निधन झाले आहे. 

मूळचे होते कोल्हापूरचे 

19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे जन्मलेले जयंत नारळीकर यांनी आपले पदवी शिक्षण काशी हिंदू विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. तिथे त्यांनी मॅथेमॅटिकल ट्रायपॉस परीक्षेत ‘रँगलर’ आणि ‘टायसन मेडलिस्ट’ ही प्रतिष्ठेची पदके विशेष कामगिरीसाठी म्हणून मिळवली.

टाटा फंडामेंटल रिसर्च संस्थेत काम 

केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आल्यानंतर डॉ. जयंत नारळीकर यांनी टाटा फंडामेंटल रिसर्च संस्थेत (TIFR) 1972 ते 1989 दरम्यान काम केलं. याच काळात त्यांनी 1988 मध्ये IUCAA या संस्थेची स्थापना केली आणि पुढे त्या संस्थेचे संस्थापक संचालक म्हणूनही काम केले. डॉ. नारळीकर यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या ब्रह्मांडविज्ञानातील विशेष (Cosmology) योगदानासाठी ओळखले जाते. विशेषतः ‘बिग बॅंग’ सिद्धांताला पर्यायी दृष्टिकोन मांडण्यासाठी ते प्रसिद्ध होते.

साहित्यलेखन क्षेत्रातही काम 

वैज्ञानिक संशोधनाबरोबरच त्यांनी विज्ञान जनजागृतीसाठी मोठे योगदान दिले. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तके आणि लेख लिहिले. एवढंच नाही तर त्यांनी  रेडिओ आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्येही याबद्दल माहिती देण्यासाठी भाग घेतला. त्याशिवाय विज्ञान काल्पनिक साहित्यलेखन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले.

IUCAAच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, त्यांची पत्नी डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन 2023 मध्ये झाले. त्या देखील गणितशास्त्रात पीएचडी होत्या. जयंत नारळीकर यांच्या तीन मुली गीता, गिरीजा आणि लीलावती या तिघीही विज्ञानाच्या संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत.