Pallavi More Murder Case: कामाला जाते असं सांगून घरातून निघालेली 22 वर्षीय तरुणी घरी परतलीच नाही. ती तिच्या बहिणीच्या फोन कॉललाही उत्तर देत नव्हती. तिचा मृतदेह एका लॉजवर विवस्त्र अवस्थेत, पाय बांधलेल्या स्थितीत सापडला.

Pallavi More Murder Case: रायगडच्या लोणेरे येथील पल्लवी मोरे हत्याकांड प्रकरणामधील आरोपी अनिस मोहमद खान मालदार याला अलीबागच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हा घडल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी आरोपी मालदार पोलिसांच्या हाती लागला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याची आठ ते दहा पथके आरोपीच्या मागावर होती. काल रात्री ठाणे परिसरातून आरोपीला जेरबंद करण्यात आले. आज त्याला अलिबाग येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आरोपीने मृत तरुणी पल्लवी मोरे हिला लोणेरे येथील लॉजवर नेले. तिथं आधी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा धारदार शस्त्राने खून केला. या घटनेनंतर गोरेगाव परिसरात वातावरण संतप्त झाले होते. आरोपी विरोधात यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहे. आरोपीने हा गुन्हा का केला याचा शोध आता पोलिस घेत आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वडगाव बौद्धवाडी (बौद्धवाडी) येथील 22 वर्षीय पल्लवी मोरेचा मृतदेह मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजिंगच्या खोली क्र. 101 मध्ये विवस्त्र अवस्थेत, पाय बांधलेल्या स्थितीत, कोयत्याने अनेक वार केलेल्या अवस्थेत आढळला होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचेही स्पष्ट संकेत मिळत होते. या प्रकरणामध्ये मृतदेहाचं शविच्छेदन करण्यात आलं. रविवार 20 एप्रिल रोजी, सकाळी 11 वाजता पल्लवी 'कामावर जाते' असे सांगून घरून निघाली. ती घरी परतली नाही. तिने बहिणीचे फोन कॉल्सही उचलले नाहीत. कुटुंबीयांनी शोध घेतल्यावर लॉजमध्ये भयानक दृश्य समोर आले. सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच मृतदेह दिसला. प्रेमप्रकरणातून वाद झाला आणि त्याचे पर्यावसान हत्येत झाले असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला.
आरोपी मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. अनिस मोहमद खान मालदार हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. गोरेगाव पोलिस स्टेशनने हत्या, बलात्कारासारख्या गंभीर कलमांसोबतच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. फॉरेन्सिक तपास, तांत्रिक पुरावा आणि विशेष पथकाने गुन्हा घडल्यानंतर सहा दिवसांनी नवी मुंबई परिसरातून आरोपीला अटक केली असून आता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.