सोनू भिडे, नाशिक: पनीर म्हटले तर सर्वांचेच आवडीचे... हॉटेल मध्ये सुद्धा सर्वच पदार्थांमध्ये पनीरसब्जीला अधिक मागणी असते. काजू पनीर खाण्याची प्रतिष्ठा तर काही औरच असते. याच मानसिकतेचा फायदा घेऊन भेसळीचे दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या बनावट कंपन्या प्रत्येक शहरामध्ये उदयास येऊ लागल्या आहेत. अश्याच बनावट दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या नाशिक मधील दोन कारखान्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केलीय. यात लाखो रुपये किमतीचे बनावट पनीर आणि भेसळीचे पदार्थ मिळून आले आहेत.
या ठिकाणी झाली कारवाई
नाशिक शहरातील अंबड येथील मधुर डेअरी अॅण्ड डेलीनीड्स तर म्हसरूळ येथील आनंद डेअरी फार्म या आस्थापनेत भेसळयुक्त पदार्थ तयार होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गेल्या दोन महिन्यापासून अन्न औषध प्रशासन गोपनीय रित्या मागोवा घेत होते. अखेर अचूक माहिती हाती आल्यानंतर पाच ते सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी कारवाई केली. या दोनही ठिकाणी भेसळयुक्त पनीर तयार केले जात होते. अखेर दोन्ही ठिकाणे अन्न व औषध प्रशासनाने सील केले आहेत.
काय सुरू होते कंपनीत
छाप्यावेळी अंबड येथील मधुर डेअरी अँड डेलीनीड्स या कंपनीला अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत असलेला परवाना नसताना बनावट पनीर आणि तुपाचे उत्पादन सुरु असल्याचे आढळून आले. रिफाईंड पामोलीन तेलाचा वापर करून कृत्रिमरीत्या पनीर तयार केले जात असल्याच आढळून आले. विक्रेत्याकडून दोन लाख ३५ हजार ७९६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
तर एका दुसऱ्या ठिकाणी म्हसरूळ येथील आनंद डेअरी फार्मवर कारवाई केली असता दुध पावडर आणि खाद्य तेलाचा वापर करून पनीर तयार केले जात होते. या ठिकाणी दुध पावडर आणि रिफाईंड पामोलीन तेलाचा ९ लाख ६७ हजार ३१५ रुपयाचा साठा मिळून आला . दोन्ही कारखान्यातील भेसळयुक्त पदार्थाचे नमूने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
कसे ओळखावे शुद्ध पनीर
शुद्ध आणि भेसळयुक्त पनीर यामध्ये प्राथमिक दृष्ट्या कुठलाही फरक आढळून येत नाही. दिसण्यामध्ये दोन्हीही पांढरे असतात खाण्याच्या चवीतही किंचित फरक असतो मात्र त्याची विक्रीसाठी ची किंमत ही त्या पनीरचा दर्जा ठरवते दुधापासून तयार केलेले पनीर हे 300 ते 400 रुपये किलो असते, तर भेसळयुक्त पनीर हे 100 ते 200 रुपये किलोच्या दरम्यान मिळते. त्यामुळे हॉटेल्स मध्येच मिळणारी भाजी ही शुद्ध पनीरची आहे की नाही हे समजणे कठीण असते. नामवंत उत्पादनांचे मॉल्स मध्ये मिळणारे पनीरचे पॅकिंग हे खाण्यासाठी सर्वात योग्य असतात. पनीर बनवताना चे सर्व नियम त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडलेले असतात.
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात दुग्धजन्य पदार्थाची नागरिकांकडून मागणी होते. अशावेळी दुकानात मिळणाऱ्या मिठाईत भेसळ होण्याची शक्यता असते. विशेषता पेढे बर्फी दही यामध्ये प्रामुख्याने ही भेसळ केली जाते शहरात कोणत्याही ठिकाणी अशी भेसळ होत असल्याची माहिती किंवा शंका नागरिकांना असल्यास अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.