Hand Hanging From Car Secret Revealed: नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या सर्विस रोडवर धावत्या इनोव्हा कारच्या डिक्कीतून हात लटकत रील शूट केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. धावत्या इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने सोमवारी नवी मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस खातं खडबडून जागं झालं आणि या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचलं आहे. सदर प्रकरणात आता कारवाईही करण्यात आली आहे.
धावत्या इनोव्हा कारच्या डिक्कीमधून कोपरापर्यंतचा हात बाहेर लटकत असलेल्या अवस्थेत एक इनोव्हा सोमवारी नवी मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होती. हे दृष्य पाहणाऱ्या प्रत्येकाची तारांबळ उडाली. एका व्यक्तीने या कारचा व्हिडीओ शूट करुन पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. हा हात एखाद्या मृतदेहाचा किंवा कोण्या व्यक्तीचं अपहरण करुन डिक्कीत भरल्यानंतरचा तर नाही ना अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली. मात्र हे भलतेच प्रकरण निघाले.
गाडीच्या डिक्कीबाहेर दिसणारा हात हा जाणूनबुजून ठेवण्यात आला होता. तसेच हा हात मृतदेहाचा किंवा अपहरणाचा नसून हे कृत्य एक रील बनवण्याच्या नादात काही अतिउत्साही तरुणांनी केल्याचे समोर आलं आहे. सदर विडिओ पोलिसांना मिळताच पोलिसांनी गाडीच्या नंबरच्या आधारे तिचा शोध घेतला. व्हिडीओत दिसणारी इनोव्हा कार पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे मालक, चालक व त्यांचे इतर सहकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांची चौकशी केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावं खालीलप्रमाणे -
1. मीनहाज मोहम्मद अमीन शेख, वय 25 वर्षे राहणार कोपरखैरणे,
2. शहावार तारीख शेख, 24 वर्षे राहणार कोपरखैरणे,
3. मोहम्मद अनस अहमद शेख, 30 वर्षे राहणार मिरा रोड,
4. इंजमाम अख्तर रजा शेख, राहणार कोपरखैरणे
त्यांनी सदरचा प्रकार हा लॅपटॉप विक्री बाबतच्या प्रमोशनचा व्हिडिओ रील बनवण्याच्या हेतूने केल्याची माहिती पोलिसांना दिली. फोल्डेबल लॅपटॉपच्या प्रमोशनसाठी हे रील तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सदर प्रकारणी चालकाविरूध्द सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवल्याने मोटार वाहन अधिनियम कलम 184 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच रीलच्या नादात सामाजिक भावना दुखावणे किंवा भय निर्माण करणे चुकीचे असूननागरिकांनी सार्वजनीक ठेकनी हे करताना काळजी घेण्याची आवाहन गुन्हे पोलीस सहाय्यक आयुक्त अजय लांडगे यांनी केलं आहे.