मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरीमध्ये गणरायाची स्थापना
राज्यात गणरायाचे जल्लोषात स्वागत होत आहे.
निलेश वाघ ,झी २४ तास, मनमाड : राज्यात गणरायाचे जल्लोषात स्वागत होत आहे. मनमाडच्या चाकरमान्यांनी थेट मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची स्थापना केली. गेल्या २३ वर्षांपासून सर्वधर्मीय चाकरमानी गुण्यागोविंदाने लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षीही गणरायाची वाजत-गाजत उत्साहात स्थापना करून दररोजचा प्रवास सुखाचा होण्याची कामना करण्यात आली .
गोदावरी एक्स्प्रेसच्या पासधारक बोगीमध्ये वाजत-गाजत विधिवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना केली. या बोगीत आकर्षक सजावट करण्यात आली. इतर प्रवाश्यांचे या बोगीकडे लक्ष वेधले जात आहे. गणेशोत्सवाचे दहा दिवस गोदावरी एक्स्प्रेस सुटताच सकाळी मनमाडला आणि संध्याकाळी परतीच्या प्रवासात नाशिक येथे आरती करण्यात येते.
गणेशोत्सव काळात प्रवास करणारे प्रवाशीही आवर्जून गणरायाचे दर्शन घेताना प्रवास सुखाचा होण्याची कामना करतात. विशेष म्हणजे गोदावरी एक्स्प्रेसमध्ये केवळ गणेशोत्सव साजरा केला जात नाही, तर या काळात सामाज प्रबोधनाचे संदेशही दिले जातात
मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेसमध्ये साजरा होणार्या आगळ्या - वेगळ्या गणेशोत्सवाची मनमाड- मुंबई दरम्यानच्या रेल्वे स्थानकाबरोबरच राज्यभर ख्याती आहे. गणेशोत्सवाचे हे दहा दिवस सर्वधर्मीय नोकरदार , प्रवाशी एकत्र येवून गणेशोत्सव साजरा करून राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे दर्शन घडवीत असतात.