Kolhapur Police News : पोलिसांसंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वसामान्यांना गुन्हेगारीपासून रोखणाऱ्या पोलिसानेच पोलिसाकडूनच खंडणी उकळली आहे.

Kolhapur Police News : कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस हे सर्वसामान्यांचा रक्षणासाठी आणि गुन्हेगाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी असतात. राज्यात कुठेही गुन्हे घडू नये याची पोलिसांकडून काळजी घेतली जाते. पण जर पोलीसच गुन्हा करत असेल तर...हो असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये पोलिसानेच पोलिसाकडून खंडणी उकळली आहे. (Police extorted ransom from police for transfer female constable Kolhapur Crime News)
हे प्रकरण आहे आंतर जिल्हा बदली प्रकरणाचं...झालं असं की फिर्यादी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे पोलीस शिपाई आहेत. रितेश मनोहर ढहाळे असं या पोलीस शिपाईचं नाव असून ते चंदगड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. वडिलांच्या आजारपणामुळे त्यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केला होता. हा अर्ज हेड क्लार्क संतोष मारुती पानकर (रा. कसबा बावडा) याच्यातडे आला.
त्यानंतर संतोष मारुती पानकर यांनी रितेश मनोहर ढहाळे यांना फोन करुन खंडणीची मागणी केली. आंतर जिल्हा बदलीवर जायचे असेल तर 30 हजार रुपये दयावे लागतील अन्यथा तुझी बदली होणार नाही अशी भीती घातली. तसंच बदलीसाठी 30 हजार रुपये देणेस भाग पाडले. रक्कम महिला कॉन्स्टेबल धनश्री जगताप हिच्याकडून ऑनलाईन स्विकारल्याची फिर्याद दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान याची माहिती मिळताच कोल्हापूर आंतरजिल्हा बदलीसाठी पोलिसांकडून 30 हजारांची खंडणी स्वीकारल्या प्रकरणी पोलीस मुख्यालयातील हेड क्लार्कसह, महिला कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संतोष मारुती पानकर (रा. कसबा बावडा) याला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. तर महिला कॉन्स्टेबल धनश्री उदय जगताप हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार रितेश मनोहर ढहाळे यांनी 23 जुलैला धनश्री जगताप हिला ऑनलाइन पैसे पाठवल्याचे फिर्यादीत म्हटलंय.
बदलीसाठी हेडक्लार्कनेच पैसे स्वीकारल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी पानकर याला कार्यालयात बोलवून घेतले. त्याची कानउघडणी करून शाहूपुरी पोलिसांना त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी शुक्रवारी 25 जुलैला मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करून पानकर याच्यावर अटकेची कारवाई केली. जगताप हिला अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.