प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा दणका

Prashant Koratkar Controversy: कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Mar 18, 2025, 05:34 PM IST
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा दणका
प्रशांत कोरटकर

Prashant Koratkar Controversy: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन करणे तसेच छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या आहेत. अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रशांत कोरटकरने न्यायालयात अर्ज केला होता. पण न्यायालयाकडून त्याला दणका मिळाला आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रशांत कोरटकर याला अटकपूर्व जमीन मिळणार नाही. यामुळे प्रशांत कोरटकर याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

तो आवाज कोरटकरचाच

प्राथमिक माहितीनुसार इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी CDR मधून प्रशांत कोरटकरनेच आपल्या मोबाईलवरून इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय. यामधून प्रशांत कोरटकरने फोनवरून इंद्रजित सावंत यांना फोन केल्याचं स्पष्ट झालाय. तसेच धमकी देताना त्याने त्याचा आवाज बदलल्याचा दावा केला गेला होता. परंतु, आता पोलिसांनी हा दावा फेटाळला असून या प्रकरणांतर प्रशांत कोरटकर फरार झाला आहे. त्यामुळे त्याच्या अचानक गायब होण्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यासोबत त्याच्यावर दाखल झालेल्या तक्रारीनुसार भारतीय न्यायसंहितेच्या कलम 151 (शांतता भंग करणे), कलम 196 ( खोटी माहिती देणे ), कलम 299 (मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने कृत्य करणे), कलम 302 (खून करणाऱ्या व्यक्तीला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते), कलम 352 (गंभीर चिथावणी देण्याशिवाय प्राणघातक हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे). 

नागपूर पोलिसांकडून शोध सुरु  

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करून माहिती घेण्यात आली. कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक विभागाकडून ही माहिती घेण्यात आली. प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्य विधान करून इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर प्रशांत कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.या गुन्ह्याच्या अनुषंगाने फॉरेन्सिक विभागाकडून इंद्रजीत सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर यांच्या सोबत झालेला संवाद आलेले फोन रेकॉर्डस याची माहिती घेतली. त्याचबरोबर इंद्रजीत सावंत यांच्या आवाजाचे नमुने देखील घेण्यात आले. दरम्यान कोल्हापूर पोलिसांचे एक पथक नागपूर मध्ये प्रशांत कोरटकर याचा शोध घेत आहे. पण अद्याप कोरटकर पोलिसांना सापडलेला नाही.