Pratap Sarnaik on Rickshaw Taxi Drivers License: मराठीवरुन परवाना रद्द करण्याची आमची भूमिका नाही असं परिवहनंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.

Pratap Sarnaik on Rickshaw Taxi Drivers License: राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. 1 मेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र यानंतर परप्रांतीय रिक्षा, टॅक्सी चालकांची मुजोरी पाहायला मिळालीय. तर दुसरीकडे अनेकजण मराठी शिकण्यासाठी इच्छुक आहेत. काही ठिकाणी रिक्षाचालकांनी परतीची वाट धरली आहे. दरम्यान झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' या विशेष मुलाखतीत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेवरुन परवाना रद्द होणार नाही असं स्पष्ट करत नेमकी भूमिका सांगितली.
चालकांची परीक्षा कशी घेतली जाणार? याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "आम्ही परीक्षा वैगैरे घेणार नाही. आमच्याकडे काही तक्रारी आल्या आहेत की, परमिट, परवाना, बॅच दिले जात असताना कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. 15 वर्ष वास्तव्याची अट असतानाही परराज्यातून येतो, सहा महिन्यापूर्वी, एक महिन्यापूर्वी येतो, त्याला परमिट, बॅच सगळं कसं मिळतं याची चौकशी होणार. खोटी कागदपत्रं सादर केली असतील तर त्यांची पोलीस तक्रार करणार. लायसन्स, बॅच दिले असतील तर संबंधित आरटीओच्या कर्मचाऱ्यांवर पण कारवाई करणार. यांनाही दिलेलं लायसन्स, बॅच रद्द करणार".
"तुम्हाला प्राथमिक मराठी बोलता येतं का....येत नसेल तर आम्ही शिकवू. आमची शिकवायची मानसिकता आहे. मराठीवरुन परवाना रद्द करण्याची आमची भूमिका नाही. कागदपत्रं खोटी असतील तर कारवाई होणार," असं त्यांनी स्पष्ट केलं. पुढे ते म्हणाले, "मराठी शिकवू, शिकवण्यासाठी मदुत देऊ. त्यातही जर नाही बोलला तर आम्ही कारवाई करु. पण शेवटी शिकावं लागेल".
"मराठी राजभाषा असून ती शिकावी लागेल. संधी देऊनही तुम्ही शिकलं नाही, मुजोरी दाखवली तर कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत. परिवहन खात्याचा मंत्री, आरटीओचा अधिकारी त्याच्या दुटप्पीपणा, मुजोरीबद्दल ती शिक्षा देऊ शकतो," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ग्रामीण भागातील आपल्या लोकांनी रिक्षातून, टॅक्सीतून जायचं असेल किंवा ओला, उबरमधन जायचं असेल आणि हिंदीचं ज्ञान नसेल तर किमान संवाद सादताना चालकाला समजलं पाहिजे. बऱ्याचदा चालक अरेरावीने बोलत असल्याची तक्रार येते. भाषिक वाद निर्माण होऊन पोलिसांपर्यंत प्रकरण जातात. मराठी शिका आणि प्रवाशांशी मराठीत बोला. यामुळे जास्त मराठी प्रवासी येतील आणि रोजगार वाढेल असंही त्यांनी सांगितलं.
आपलीच लोकं यासाठी कारणीभूत आहेत. मराठी माणसांची फार मोठी चूक आहे. मराठी माणसांनी रिक्षाचालक, टॅक्सीचालक हिंदीभाषिक आहेत असं समजून ठेवलं आहे. त्यांच्याशी हिंदीत बोलतात. आपलीही मानसिकता बदलली पाहिजे. जरी हिंदी भाषिक असला तरी मराठीत बोला असं आवाहन त्यांनी केलं.
मुजोर रिक्षा चालाकंसाठी मोहीम करत आहोत. ही मुजोरी तुमच्या राज्यात चालू द्या. महाराष्ट्रात धंदा करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. आम्ही काय मराठी साहित्यिक व्हा असं सांगत नाही. मराठीच्या कविता लिहा, लेख लिहा, तीन तास परीक्षा घेऊ असं सागंत नाही आहोत. जेवढं मराठी शक्य असेल तेवढं बोलायाल हवं असं त्यांनी सांगितलं.