हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील करवाडी या गावात पुरेशा आरोग्याच्या सुविधा नाहीत. त्याचीच प्रचिती देणारी एक घटना या गावात घडली. एका महिलेला  अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला उपचारासाठी शहरात कसे न्यायाचे हा प्रश्न समस्त गावकऱ्यांना पडला. कारण या गावात नीट रस्ते नसल्याने वाहनांची वाहतूक होत नाही. या सगळ्या अडचणीत एक रुग्णवाहिका आली पण ती देखील गावापासून तीन किमी अंतरावर थांबली. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अखेर ग्रामस्थांनीं महिलेला खाटेवर झोपवून तीन किलोमीटरची पायपीट केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळमनुरी तालुक्यातील नांदापूर ग्रामपंचायत अंतर्गत करवाडी एक छोटेसे गाव आहे. या गावाची लोकसंख्या आहे फक्त चारशे. या गावात आदिवासी बहुल समाज राहतो. बहुसंख्य गावकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे शेती. गावात आजही धड रस्ता नाही. पावसाळ्यात चिखलाची मळलेली वाटच तुडवत जावे-यावे लागते. इतकी दळणवळणाची वाईट अवस्था आहे. अशा करवाडी गावातील एका महिलेस प्रसूती वेदना होत असताना तिच्या नातेवाईकांनी रुग्णसेविकेसाठी फोन केला. 


परंतु, गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका गावापासून तीन किलोमीटर अंतरावर उभी राहिली. या महिलेस असह्य वेदना होत असल्याने गावकऱ्यांनी एका खाटेवर तिला झोपवून तीन किलोमीटर अंतरावर पायपीट करून महिलेस रुग्णवाहिकेपर्यंत आणले. त्यानंतर महिलेस पोत्रा येथे नेण्यात आले. मात्र, ती अस्वस्थ झाल्याने परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेऊन त्या महिलेस हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावातील नागरी सुविधांकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी वारंवार शासनाकडे मागणी केली. त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केली. मात्र, त्याची दखल अद्यापतरी शासनाने घेतली नाही.