मुंबईतील घर घेणे आता परवडणार; म्हाडा लवकरच सर्वसामान्यांसाठी घेणार मोठा निर्णय

MHADA Mumbai Lottery: मुंबईत घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. घर घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 21, 2025, 08:27 AM IST
 मुंबईतील घर घेणे आता परवडणार; म्हाडा लवकरच सर्वसामान्यांसाठी घेणार मोठा निर्णय
Prices of MHADA houses in Mumbai will decrease soon

MHADA Mumbai Lottery: मुंबईत घरांच्या किंमती आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य म्हाडाच्या घरांवर अवलंबून आहेत. मात्र म्हाडच्या घराच्या किंमतीही चांगल्याच वाढल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांना म्हाडाची घरे खरेदी करण्यासाठीही विचार करावा लागत आहो. मात्र लवकरच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.

म्हाडाने नेमलेली समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचेदेखील नुकसान होणार नाही यादृष्टीने अभ्यास करणार आहे. पुढील तीन महिन्यांत ही समिती आपला अहवाल उपाध्यक्षांकडे सादर करणार असून त्यानंतर तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे. 

म्हाडाच्या घराच्या किंमती कशा ठरतात?

सध्या जमिनीचा खर्च, बांधकाम खर्च आणि आस्थापन खर्च आदींचा विचार करून म्हाडाच्या घराच्या किमती निश्चित केल्या जातात. अत्यल्प आणि अल्प गटातून म्हाडा शून्य टक्के नफा घेते. मध्यम उत्पन्न गटातून दहा टक्के तर उच्च उत्पन्न गटातून 15 टक्क्यांपर्यंत नफा घेऊ शकते. म्हाडाने एखादा भूखंड दहा-बारा वर्षांपूर्वी घेतला असेल तर त्या भूखंडाच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च केला असेल तर त्या खर्चाचादेखील घराच्या किमतीत समावेश केला जातो. त्यामुळे साहजिकच घरांच्या किमती वाढतात. एखाद्या भूखंडावर उशिरा इमारत बांधली गेली असेल तर त्याचा भुर्दंड सर्वसामान्यांनी का सहन करायचा? प्राधिकरणाचे नुकसान न होता सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळाले पाहिजे यादृष्टीने घरांच्या किमती ठरवताना कोणत्या गोष्टी अंतर्भूत करायच्या आणि कोणत्या नाही याचा समिती अभ्यास करणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

क्षेत्रफळाऐवजी किमतीनुसार उत्पन्न गट ठरणार 

म्हाडाच्या धोरणानुसार 300 चौरस फुटापर्यंतची घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी, 450 चौरस फुटापर्यंतची घरे अल्प उत्पन्न गटासाठी, 600 चौरस फुटापर्यंतची घरे मध्यम उत्पन्न गटासाठी तर 900 चौरस फुटापर्यंतची घरे उच्च उत्पन्न गटासाठी देण्यात येतात. उपनगरातील 300 चौरस फुटाच्या घराची किंमत आणि तेवढ्याच क्षेत्रफळाच्या दक्षिण मुंबईतील घराची किंमत यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. त्यामुळे घराच्या क्षेत्रफळाऐवजी त्याच्या किमतीनुसार उत्पन्न गट ठरवता येतील का, याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.