Coronavirus : व्यवस्थेच्या अनागोंदी कारभारामुळे पत्रकाराचा मृत्यू; कुटुंबीयांचा आरोप

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

Updated: Sep 2, 2020, 02:56 PM IST
Coronavirus : व्यवस्थेच्या अनागोंदी कारभारामुळे पत्रकाराचा मृत्यू; कुटुंबीयांचा आरोप  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

पुणे : कोरोना व्हायरसचा कहर दर दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. व्यवस्थेच्या अनागोंदी कारभारामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप रायकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

पालकमंत्री अजित पवारांनी माध्यमांकडून यासंदर्भाती प्रश्न विचारला जाताच त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली. 

पांडुरंग रायकर मराठी वृत्तवाहिनी टीव्ही ९ मध्ये वार्ताहर म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. दरम्यान रायकर यांच्या मृत्यूमुळे सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

 

पांडुरंग रायकर यांचा मृत्यू व्यवस्थेच्या अनागोंदी कारभारामुळे झाला आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया रायकर यांच्या बहिण अक्षरा शेंडगे यांनी दिली आहे. भावाला वेळेत गोळ्या पोहोचवण्यात आल्या नाहीत. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी जेवणाचा डबाही वेळेत दिला नाही, असा आरोप अक्षरा यांनी केला आहे. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळत नसतील तर काय उपयोग असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला.