Crime News In Marathi: अहिल्यानगर जिल्यातील श्रीगोंदा हत्या प्रकरणातील गूढ अखेर समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी कसून तपास करत दाणेवाडी गावातीलच सागर गव्हाणे या आरोपीला ताब्यात घेतले असून एक अल्पवयीन आरोपी ही या हत्याकांडात सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपींनी 18 वर्षांच्या माउली गव्हाणेची हत्या का केली याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र, गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीतून भलतंच कारण समोर आलं आहे.
१८ वर्षीय माऊली गव्हाणेची तीन दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कटरच्या सहाय्याने त्याचे शीर, धड आणि हात-पाय कापून गावातीलच वेगवेगळ्या विहिरीत फेकून देण्यात आले होते. या हत्याकांडाने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. बारावीत शिकणार्या मुलाची इतक्या निर्घृणपणे हत्या का करण्यात आली, असाच सवाल उपस्थित होत होता.
माऊली गव्हाणे हा ६ मार्चला शिरूर येथे बारावीच्या पेपरसाठी आल्यानंतर बेपत्ता झाला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता. याच दिवशी दाणेवाडी गावातील दोन वेगवेगळ्या विहिरीत शीर आणि हात पाय आढळून आले होते. या दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये आढळलेले शीर आणि धड याची ओळख पटल्यानंतर गावात एकच खळबळ पसरली होती.
पोलिसांनी या प्रकरणात सागर गव्हाणे याला अटक केली आहे. तर, दुसरा आरोपी हा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या दोघांनी संगनमताने माऊलीची हत्या केली. आरोपी आणि त्याचा साधीदार यांचे समलैंगिक संबंध होते. या संबंधांबाबत माऊली याला माहिती झाले. माउलीने जर कुठे याची वाच्यता केली तर आपली बदनामी होईल, या भातीने दोघानी त्याची हत्या करण्याचा कट रचला, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
6 मार्चच्या दिवशी माऊलीला रात्री 11.30 च्या सुमारास दोघा आरोपींनी बोलवून घेतले. त्यानंतर दोघांनी त्याचा गळा आवळून खून केला. नंतर इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने त्याचे हात,पाय, धड आणि शिर वेगवेगळे केले आणि गावातील विहीरींत मृतदेहाचे अवयव फेकून दिले असल्याचे समोर येत आहे.