'मटण थाळी'मुळे गेली 5 पोलिसांची नोकरी; गजा मारणे कनेक्शन चर्चेत; 'कणसे ढाब्या'वर घडलं काय?

Gajanan Marne Police Suspended: या प्रकरणानंतर काही दिवसांनी कारवाई करण्यासाठी कारणीभूत ठरलं ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज

स्वप्निल घंगाळे | Updated: May 14, 2025, 09:41 AM IST
'मटण थाळी'मुळे गेली 5 पोलिसांची नोकरी; गजा मारणे कनेक्शन चर्चेत; 'कणसे ढाब्या'वर घडलं काय?
संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कैद (प्रातिनिधिक फोटो)

Pune Police Suspended 5 In Gajanan Marne Connection: कुख्यात गँगस्टर गजानन ऊर्फ गजा मारणेने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर 'मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु, पोलिस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलिस शिपाई राहुल परदेशी यांचा समावेश आहे. 

नेमकं त्या ढाब्यावर घडलं काय?

कोथरूडमधील भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणात गुंड गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच 'मोकोका'अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सुरुवातीला काही दिवस तो येरवडा कारागृहात बंदिस्त होता. मात्र, पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील त्याचे वाढते वर्चस्व लक्षात घेता त्याला सांगली कारागृहात हलवण्यात आले. त्याला सांगली कारागृहात नेत असताना वाटेत साताऱ्याजवळील 'कणसे ढाब्या'वर पोलीस व्हॅन थांबवून कर्मचाऱ्यांनी जेवण केले. इतकेच नाही तर याच वेळी दोन फॉर्च्यूनर आणि एका थार गाडीतून आलेल्या गजा मारणेच्या साथीदारांनी पोलीस व्हॅनमध्ये असणान्या गजा मारणेला मटणाचा बेत दिला. हा संपूर्ण प्रकार ढाब्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

काही दिवसांनी या ढाबा पार्टीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना समजली. त्यांनी तातडीने गुन्हे शाखेतील या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. संबंधित कणसे धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून घटनेची पुष्टी करण्यात आली. यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस दलातील शिस्त आणि जबाबदारीच्या दृष्टिकोनातून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

त्या तिघांवरही गुन्हा दाखल

गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना दोन फॉर्च्यूनर आणि एका थार गाडीतून गजा मारणेच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर ढाब्यावर गाडी थांबल्यानंतर सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते या तिघांनी त्याला पोलीस व्हॅनमध्ये जेवण दिले. त्यामुळे पोलिसांनी या तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. यातील विशाल धुमाळवर खूनाचा गुन्हा दाखल आहे, तर पांड्या मोहिते सांगलीत गजा मारणेच्या टोळीचा शूटर म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले.