Pune Bridge Collapse: पूल कोसळण्याच्या काही सेकंद आधीचा थरारक फोटो समोर; मृतांची संख्या वाढणार?

Pune Indrayani Kundmala Bridge Collapse: रविवारी पुण्यात घडलेल्या या घटनेची राज्यभरामध्ये चर्चा असतानाच एक धक्कादायक फोटो समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 16, 2025, 01:56 PM IST
Pune Bridge Collapse: पूल कोसळण्याच्या काही सेकंद आधीचा थरारक फोटो समोर; मृतांची संख्या वाढणार?
समोर आला हदरवून टाकणारा फोटो

Pune Indrayani Kundmala Bridge Collapse:  पुण्यामधील मावळ प्रांतातील तळेगावजवळच्या कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला पूल रविवारी सायंकाळी नदीत कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुसऱ्या दिवशीही या ठिकाणी शोधकार्य सुरु आहे. असं असतानाच या अपघाताची दाहकता दर्शवणारा आणि हा पूल नदीत कोसळण्याच्या काही क्षण आधीचा हादरवून सो़डणारा फोटो समोर आला आहे. 

समोर आला धक्कादायक फोटो

समोर आलेल्या दुर्घटनेपूर्वीच्या फोटोमध्ये कुंडमळा पूल लोकांनी खचाखच भरल्याचं दिसत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला जाळ्या दिसत असून पुलावर मुंगीलाही चढायला जागा नाही एवढी गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे. हा पूल मध्यभागी खचला आणि खाली कोसळला त्यावेळी त्यावर शंभरहून अधिक लोक असल्याचे दावे केले जात आहेत. याच दाव्यांना दुजोरा देणारा फोटो समोर आला असून अपगाताची दाहकत या फोटोमधून अधोरेखित होत आहे. 

जखमींची संख्या वाढण्याची भीती

पूल खाली कोसळताना त्यावर उभे असलेले लोक आहेत त्या स्थितीमध्ये नदीच्या पात्रात पडल्याचं फोटोवरुन स्पष्ट होत आहे. हा फोटो नेमका कोणी काढला याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र फोटोमधील लोकांची संख्या पाहता बेपत्ता असलेल्यांची तसेच मयत व्यक्तींशी संख्या वाढू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

गाड्या आणि माणसं एकाच वेळी

कुंडमळा येथील पूल पडण्यासाठी पुलावर झालेली गर्दी कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही गर्दी वाढण्यामागे पुलावर आलेल्या दुचाकी कारणीभूत असल्याचे या अपघातात जखमी झालेल्या पर्यटकांनी सांगितले आहे. मुळातच चार फूट रुंद असलेल्या पुलावर दुचाकी आल्या आणि पुलावर जाणे येणे अशक्य झाले. पुलावर प्रचंड गर्दी झाल्याचं अपघातातील जखमी पर्यटकांनी सांगितलं आहे. अरुंद पूल आणि त्यात दुचाकी त्यामुळे पर्यटक एकाच जागी अडकले आणि पुलावर प्रचंड भार पडल्याने पूल कोलमडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.

पूल बंद असल्याचा फलकही लवलेला

पूल जुना झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसा फलकही पुलाच्या तोंडाशी लावण्यात आलेला. समोर आलेल्या माहितीनुसार कुंडमळा येथील दुर्घटनाग्रस्त पूल हा अवघा 30 वर्ष जुना होता. मात्र या पुलाच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे प्रशासनाकडून फारसे लक्ष दिले जात नव्हते. यामुळेच पुलाची स्थिती सतत खालावत गेली आणि जास्त भारामुळे तो रविवारी कोसळला. हा पूल राज्य सरकारने बांधला होता. नव्या पुलाच्या बांधणीसाठी आठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.