पुण्यात लपलेत दहशतवादी? मध्यरात्रीपासून सर्च ऑपरेशन; 300 हून अधिक पोलीस अन्...

Pune Kondhwa Search Operation: मध्यरात्रीपासूनच पुण्यातील या भागामध्ये 300 हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेलं हे सर्च ऑपरेशन सुरु झालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 9, 2025, 11:17 AM IST
पुण्यात लपलेत दहशतवादी? मध्यरात्रीपासून सर्च ऑपरेशन; 300 हून अधिक पोलीस अन्...
पुण्यात अनेक ठिकाणी छापेमारी

Pune Kondhwa Search Operation: पुण्यात पुन्हा दहशतवादी लपल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे मध्यरात्रीपासूनच पुण्यामध्ये दहशतवादीविरोधी पथकाने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. मागील अनेक तासांपासून हे ऑपरेशन सुरु असून एटीएसकडून काही लोकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. एटीएसच्या या सर्च ऑपरेशनच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली आहे. एटीएस आणि पुणे पोलिसांकडून 18 संशयित व्यक्तींचा शोध सुरू असून त्यातील काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. 

Add Zee News as a Preferred Source

300 हून अधिक कर्मचाऱ्यांचा छापेमारीत सहभाग

पुण्यातील कोंढवा भागात मध्यरात्रीपासून जवळपास 300 पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. एटीएसचे अधिकारी व कर्मचारीही या मोहिमेमध्ये सहभागी होते. तर काही ठिकाणी एनआयएचीही मदत घेण्यात आली. पुण्यातील कोंडवा आणि पिंपरी चिंचवड परिसरात एकाच वेळी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. अचानक येथील वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे मारण्यात आले. पुणे पोलिसांच्या या कारवाईने केवळ राज्यातच नाही तर देशभरामध्ये खळबळ उडाली आहे.

छापेमारीचं नेमकं कारण काय?

कोंढवा भागातील मीठानगरसह 19 ते 25 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. संशयितांच्या घरांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं तपास यंत्रणांनी स्पष्ट केलं आहे. दहशतवादाशी संबंधित संशयितांच्या हालचालींवर माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. 2023 मध्ये याच कोंढवा भागात आयएसआयएसशी संबंधित तीन संशयितांना अटक झाली होती, ज्यात बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि ड्रोन मटेरिअल सापडले होते. त्या प्रकरणाशी जोडलेल्या नवीन प्रकरणांमध्ये आजची छापेमारी करण्यात आल्याचे समजते. ताब्यात घेण्यात आलेल्या अनेकांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 

500 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात

छापेमारीनंतर या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून 500 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. ही कारवाई पुण्यातील दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. पुढील तपशील चौकशीतून समोर येईल असे समजते.

पुण्यात अनेकदा दहशतवादाविरोधात कारवाई

पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दशकांत दहशतवादी घटनांमुळे अनेक मोठ्या मोहिमा राबवल्या गेल्यात. प्रामुख्याने इंडियन मुजाहिद्दीन (आयएम), लश्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि आयएसआयएससारख्या संघटनांशी संबंधित या कारवायांमध्ये महाराष्ट्र एटीएस, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि पुणे पोलिसांचा सहभाग असतो. अशीच कारवाई आता करण्यात आली.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More