'माझं नाव लक्षात ठेव...', पिकअप व्हॅनची काच फोडणाऱ्या चालकाला पुणे पोलिसांनी घडवली आयुष्यभराची अद्दल

हडपसर येथील मगरपट्टा ओव्हरब्रिजजवळ सूरज रमेश पाटील याने निष्काळजीपणे चालवलेली एक स्कूल बस पिकअप व्हॅनला धडकली, ज्यामुळे दोन्ही वाहनांच्या चालकांमध्ये वाद झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 13, 2025, 03:12 PM IST
'माझं नाव लक्षात ठेव...',  पिकअप व्हॅनची काच फोडणाऱ्या चालकाला पुणे पोलिसांनी घडवली आयुष्यभराची अद्दल

पुण्यात पोलिसांनी रस्त्यावर हैदोस घालत, पिकअप व्हॅनची काच फोडणाऱ्या बस चालकाला जन्माची अद्दल घडवली आहे. पुणे पोलिसांनी या बसचालकाला अटक केली आहे. हडपसर येथील मगरपट्टा ओव्हरब्रिजजवळ स्कूल बस चालवणाऱ्या या चालकाने पिकअप व्हॅनला धडक दिल्यानंतर वाद झाला होता. यानंतर त्याने पिकअप व्हॅनची काच फोडली आणि ड्रायव्हरला शिवीगाळ केली. यानंतर पुणे पोलिसांनी चालकाला अटक केली असून, रस्त्यावर धिंड काढत जन्माची अद्धल घडवली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज रमेश पाटील असं 32 वर्षीय चालकाचं नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, चिंचवडमधील शाहू नगर येथील अनिकेत पार्क येथे तो वास्तव्यास आहे. शनिवारी त्याला भारतीय न्याय संहिता कलम 281 (बेदरकारपणे वाहन चालवणे), 351(2) (गुन्हेगारी धमकी), 352 (हल्ला) आणि 324 (2) (दुखापत करणे) या कलमांखाली दाखल केलेल्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील शाळेची बस निष्काळजीपणे चालवत होता. गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्याच्या बसने गाडी पिकअप व्हॅनला धडक दिली. ज्यामुळे दोन्ही वाहनांच्या चालकांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात पाटीलने पिकअप व्हॅनच्या चालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. तो असेही म्हणाला की, "माझ्या गाडीचा नंबर लक्षात ठेव आणि कोणत्याही पोलिस चौकीत जा. माझं नाव सूरज पाटील आहे". त्यानंतर त्याने व्हॅनची काचही फोडली. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांनी बसचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यानंतर चिंचवड परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर पाटीलला ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी आणली आणि धिंड काढली. इतकंच नाही तर त्याला ज्या जागेवर गुडघ्यावर बसून माफी मागायला लावली. 

हडपसर पोलिसांनी सोशल मीडियावर व्हिडीओदेखील शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी "आधी आणि नंतर" असं लिहिलं आहे. व्हिडीओत त्याने पिकअप व्हॅनवर केलेला हल्ला आणि चालकाशी केलेलं गैरवर्तन आधी दाखवण्यात आलं आहे. यानंतर त्याची धिंड कशी काढली हे व्हिडीओत दाखवलं आहे. व्हिडिओमध्ये आरोपीने अशी चूक पुन्हा करणार नाही असं म्हणत माफी मागतानाही दाखवलं आहे. 

पोलिसांनी सांगितलं की, पाटील हडपसर परिसरातील शेवळवाडी येथे त्याच्या बसच्या सर्व्हिसिंगसाठी आला होता. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये मुलं नव्हती. पाटीलने पिकअप व्हॅन चालकाला भरपाईही दिली, असल्याचं पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितलं आहे.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More