तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : (Pune Porsche Accident) पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात एकिकडे दर दिवशी नवनवीन खुलासे आणि गौप्यस्फोट होत असतानाच आता अपघातप्रकरणी अडचणीत सापडलेल्या 'त्या' अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. ज्यामुळं येत्या काळात विशाल अग्रवालपुढील अडचणी आणखी वाढणार असल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पवयीन आरोपीचे वडिल, विशाल अग्रवालच्या प्रतापांमध्ये भर पडली असून, त्यानं नियम धाब्यावर बसवून महाबळेश्वरमध्ये पंचतारांकीत हॉटेल उभारल्याचं सांगितलं जात आहे. शासकीय जागेत अग्रवालनं हे हॉटेल उभारलं असून, त्याविरोधात नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी महाबळेश्वर नगरपालिकेत अनेक तक्रारी दाखल आहेत.


प्रत्यक्षात मात्र तक्रारी दाखल असूनही असूनही अग्रवालवर कारवाई होत नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी केला. फक्त नियमांची पायमल्लीच नव्हे, तर विशाल अग्रवालने स्वत:च्या नावावर दाखवलेलं हे हॉटेल दुसऱ्याला भाडेतत्त्वावर दिल्याचाही आरोप करण्यात येत आहे. ज्यामुळं आता याप्रकरणी पुढं कोणती कारवाई होते यावर सर्वांचं लक्ष आहे. 


या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे म्हणतात...


दरम्यान, सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत कोणाचंही अनधिकृत बांधकाम खपवून घेतलं जाणार नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 


महाबळेश्वरमधील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 'इथं कोणाचंही अनधिकृत बांधकाम खपवून घेतलं जाणार नाही, मग कोणी अग्रवाल असो नाहीतर दुसरा कोणी. महाबळेश्वरमध्ये कोणतेही अनाधिकृत बांधकाम होणार नाही याची खबरदारी घेतली जातेय. तरीदेखील कुणी अनधिकृत बांधकाम केल्यास बुलडोझरने तोडा' असे आदेशच मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 



हेसुद्धा वाचा : Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहिती


 


'महाबळेश्वर हा निसर्गरम्य परिसर असल्यामुळंच इथं मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करत निसर्गाच्या सौंदर्यामध्ये आणखी भर टाकण्याचं काम सुरु आहे. अशा परिस्थितीत इथं कोणी बेकायदेशीर कामं करत असेल, रिसॉर्ट बांधलं असेल मग ते अग्रवालचं असो किंवा इतर कोणाचं, बेकायदेशीर असेल तर बुलडोझर लावून तोडण्याच्या सक्त सूचना मी दिल्या आहेत. कोणालाही पाठिशी घालण्याचा विषय इथं असता कामा नये', अशा परखड शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.