Pune Rathi Family: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्ह्यांच्या घटनांत वाढ होताना पाहायला मिळतेय. मात्र, 31 वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या राठी हत्याकांडाने आजही पुणेकरांच्या अंगावर काटा येतो. पुण्यात सुखवस्तीत राहणाऱ्या राठी परिवारातील 8 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. चार वर्षांच्या चिमुकल्यासह ते न जन्मलेल्या बाळालाही अत्यंत निर्घृणपणे संपवण्यात आले होते. हल्लेखोरांनी अत्यंत निर्दयीपणे 8 जणांचे गळे चिरण्यात आले होते.
26 ऑगस्ट 1994 साली पुण्यातील फौड फाट्याजवळील शीलविहार कॉलनीत ही घटना घडली होती. पुण्यातील कर्वे रोडवर राठी कुटुंबाचे मिठाईचे दुकान होते. केसरीमल राठी आणि त्यांचा मुलगा संजय राठी हे दुकान चालवत होते. 26 ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळी संजय राठी त्याचा मेव्हणा श्रीकांत नवनदारसोबत घरी पोहोचला. कित्येक वेळ तो दरवाजा वाजवत होता. मात्र घरातील कोणीच दरवाजा उघडला नाही. घरातून कोणीच दार उघडत नाही बघत त्याने आजूबाजूला चौकशी केली कोणतीच माहिती न मिळाल्याने संजय आणि श्रीकांत दोघे पुन्हा दुकानात गेले आणि त्यांनी घराची दुसरी चावी घेऊन आले.
संजय आणि श्रीकांत घरात जाताच त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली. घरात रक्ताचा सडा पडला होता. भिंतींवर रक्ताचे डाग होते. श्रीकांत आणि संजय धावत घरात शिरले तर घरात असलेल्या सर्वच जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. केसरीमल राठी यांच्या पत्नी मीराबाई, मुली प्रीती आणि हेमलत नावंदर, सून नीता, नातू प्रतीक नावंदर आणि चिराग तसंच, घरातील मोलकरीण सत्यभामा सुतार यांची हत्या करण्यात आली होती. सून नीता या गर्भवती होती त्यांच्या पोटातील बाळासह 8 जणांचा खून करण्यात आला होता. घरातील सामानदेखील अस्तावस्त पडलं होतं. घरातील काही सामान आणि ऐवज लुटला होता.
पोलिस लगेचच घटनास्थळी आले आणि त्यांनी या हत्याकांडाचा तपास सुरू केला. पोलिसांनी राठी कुटुंबीयांच्या दुकानात काम करणाऱ्यांचीही चौकशी सुरू केली. तेव्हा एक धागा पोलिसांच्या हाती लागला. केसरीमल यांच्या दुकानात काम करणाऱ्या राजू पुरोहित आणि जितू गेहलोत यांनी नारायण चौधरी या साथीदाराच्या मदतीने हे हत्याकांड घडवले.
आरोपींनी 23 ऑगस्ट रोजी या हत्याकांडाचा कच रचला आणि धारदार चाकू, मिरची पूड खरेदी केली होती. आरोपी दुपारच्या वेळी राठी यांच्या घराजवळ आले. त्यानंतर घरात पोहोचल्यावर त्यांनी घरातील सदस्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली या प्रकारामुळं सर्वजण रडू लागले. नारायण आणि जितूने चाकूचा धाक दाखवत मीराबाईंकडे दागिन्यांची मागणी केली. मीराबाईंनी दागिने काढून दिल्यावर आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर घरातील सर्वच व्यक्तींना एकएक करून संपवले.
पुणे पोलिसांनी राजू राजपुरोहितला 14 ऑक्टोबर 1994 ला राजस्थानातून पकडले. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक झाल्यानंतर 18 डिसेंबर 1995 रोजी त्याने आपला कबुलीजबाब नोंदवला. राठी कुटुंबीयांची हत्या चोरीच्या उद्देशाने घडली असल्याचे उघड झाले. राजू आणि जितूच्या मदतीने राठी कुटुंबीयांचे खून केल्याची तपासणी नारायण याने केली. प्रत्यक्ष खूनांत राजूचा सहभाग कमी होता हे लक्षात घेऊन तेव्हा राजूला माफीचा साक्षीदार करण्यात आले. राजू मार्फत हे हत्याकांड घडवणाऱ्या नारायण आणि जितू यांच्याविरोधात पुरावे सिद्ध करण्यात आले.