रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन वाद; संभाजी भिडेंनी सांगितली वाघ्या कुत्र्याची कथा

रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन वाद सुरु झाला आहे. संभाजी भिडेंनी वाघ्या कुत्र्याची सत्य कथा सांगितली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 27, 2025, 04:40 PM IST
रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन वाद; संभाजी भिडेंनी सांगितली वाघ्या कुत्र्याची कथा

Raigad Fort Waghya Dog Memorial Controversy Sambhaji Bhide : रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन वाद सुरु आहे. किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. या वादात आता शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांनी उडी घेतली आहे. संभाजी भिडेंनी  वाघ्या कुत्र्याच्या समाधीची कथा सांगितली आहे. 

किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी, माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. समाधी हटवण्यासाठी त्यांनी सरकारला 31 मेपर्यंतची मुदत दिली आहे. वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कपोलकल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणं, ही छत्रपती शिवाजी महाराजांशी घोर प्रतारणा असल्याचं संभाजीराजे यांनी म्हंटलंय. 

कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. 

दरम्यान, संभाजी भिडे गुरुजींनी रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचे समर्थन केले आहे. संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चुक आहे. वाघ्या कुत्र्या बाबत आपण वाचला आहे आणि ते कथा सत्य आहे असा दावा संभाजी भिडे यांनी केला. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात,तेवढी कुत्री असतात, निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे,याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे. स्वार्थासाठी कशीही मत बदलणारी माणसांना माझे मत पटणार नाही. पण त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेले नाही असेही संभाजी भिडे म्हणाले.