महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या बदलांचे संकेत, ठाकरे कुटुंबाच्या राजकीय इतिहासाचं पानही बदलेल?

Raj And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा चेंडू संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या कोर्टात टोलवलाय.

प्रविण दाभोळकर | Updated: May 12, 2025, 10:06 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या बदलांचे संकेत, ठाकरे कुटुंबाच्या राजकीय इतिहासाचं पानही बदलेल?
राज-उद्धव ठाकरे

Raj And Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणात मोठ्या बदलांचे संकेत मिळतायत. एकीकडे पवार तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबात मनोमिलन होणार का? अश्या चर्चा रंगतायेत. आज पवार काका-पुतणे एका मंचावर दिसले तर विदेश दौरा आटपुन मुंबईत परतलेल्या ठाकरे बंधुंच्या एकीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरतायत. त्यात आता राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा चेंडू संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या कोर्टात टोलवलाय.

पवार आणि ठाकरे ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदु ठरणारी दोन कुटुंबं. या दोन्ही कुटुंबांमधले अंतर्गत तणाव राजकारणातही उमटतांना दिसतात. एकीकडे शरद पवार- अजित पवार या काका पुतण्यांमध्ये उभी फुट पडली तर दोन ठाकरे बंधु वेगवेगळे रस्ते निवडले. मात्र आता या दोन्ही कुटुंबात मनोमिलनाचे वारे वाहतायेत का? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बातम्या असतांना काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली ठाकरे बंधुंची चर्चा त्यांच्या परदेश दौ-याहून परतल्यानंतर मागील पानावरुन पुढे सुरु झालीय. मात्र राज आणि उद्धव ठाकरेंच्या या युतीच्या चर्चांनंतर ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या युतीचा चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात टाकलाय. 

राज ठाकरेंच्या मुलाखतीत युती करण्याबाबात काही भाष्य नव्हतं. प्रत्येकाने आपापल्या परिने अर्थ काढल्याचं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी म्हटलंय. तर यावेळी बोलताना देशपांडे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. 

राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रु किंवा मित्र नसतो. आणि इथे तर रक्ताची नाती आहेत. आजवर राजकारणानं अनेस नाती घडवली आणि बिघडवली देखील. पवार काका-पुतण्याच्या नात्याचा नवा अध्याय लिहीला जात असतांना ठाकरे कुटुंबाच्या राजकीय इतिहासाचं पानही लवकरच बदलेल का? याची उत्सुकता आहे.