राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीचं काय ठरलं? जागावाटपावर 2 दिवसांत होणार चर्चा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी पक्षातील नेत्यांना जागावाटपाची चर्चा करण्यासाठी बैठकांचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्यात.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 17, 2025, 09:09 PM IST
राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीचं काय ठरलं? जागावाटपावर 2 दिवसांत होणार चर्चा

कृष्णात पाटील झी 24 तास मुंबई : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपावर लवकरच चर्चा होणार आहे. तशा सूचना ठाकरे बंधूंनी पक्षातील नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरे जागावाटपाच्या चर्चेसोबत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे.

Add Zee News as a Preferred Source

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती करायची हे जवळपास निश्चित केलंय. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली नसली तरी पडद्यामागून युतीच्या दृष्टीनं सगळ्या हालचाली सुरु झाल्यात. शिवसैनिक आणि मनसैनिक युती होणार अशी खूणगाठ मनाशी बांधून निवडणुकीच्या तयारीला लागलेत.. पुढच्या काही दिवसांत महापालिका निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी पक्षातील नेत्यांना जागावाटपाची चर्चा करण्यासाठी बैठकांचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून मनसेशी चर्चा करण्याची जबाबदारी काही नेत्यांवर टाकण्यात आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 

उद्धव ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळं जागावाटपात जास्तीत जास्त जागा पक्षाला घ्यायच्या पण मनसेला कुठंही दुखवायचं नाही अशी रणनिती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची असणार आहे. त्यासाठीच अनिल परब यांची नियुक्ती करण्यात आलीय.

आतापर्यंत  वरुण सरदेसाईंवर युवासेनेची जबाबदारी होती. त्यांना पहिल्यांदाच पक्षानं मोठी जबाबदारी दिलीय. वरुण सरदेसाई जागावाटपात आपलं कौशल्य पणाला लावतात का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. शिवाय आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना जागावाटपाच्या चर्चेसाठी जाणा-या समितीत स्थान देण्यात आलंय. वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण दोघंही आदित्य ठाकरेंचे जवळचे असल्यानं आदित्य ठाकरे यांच्याकडं निवडणुकीची सूत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महापालिका निवडणूक लढवत असला तरी जागावाटपाची चर्चा करण्यासाठी जाणारी समितीतील सदस्य पाहता आदित्य ठाकरेंकडंच महापालिका निवडणुकीची सूत्रं असतील हे हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे.

मनसेनंही निवडणुकीची जोरदार तयारी केलीय. शाखा-शाखांवर मनसैनिक निवडणूक याद्यांची पडताळणी करत आहेत. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार जवळपास 125 वॉर्डांमध्ये मनसेनं मोर्चेबांधणी केलीय. वेळ आल्यास 227 जागा लढण्याचीही मनसेची तयारी आहे. तरीही मराठीबहुल भागावर मनसेनं विशेष लक्ष दिलं आहे. शिवसेनेच्या समितीसोबत चर्चा करण्यासाठी मनसेकडूनही काही नेत्यांवर जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

हे मनसेच्या समितीत असू शकतात. अमित ठाकरेंना याबाबत विचारलं असता त्यांनी मनसेचे सगळे निर्णय वरिष्ठ घेतील असं सांगितलंय. तसंच या निवडणुकीत अधिकाधिक तरुणांना संधी देणार असल्याची ग्वाही अमित ठाकरेंनी दिली आहे. 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळं राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे कोणताही धोका पत्करणार नाहीत. जागावाटपाची यापूर्वी प्राथमिक चर्चा झालेली आहे. आता या दुस-या फेरीत जागावाटपाच्या चर्चेत आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं ठाकरेंसोबत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं काँग्रेसचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातल्या जागावाटपातही ठाकरेंच्या पक्षांना रणनिती निश्चित करता येणार आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More