मनसेच्या बॅनरवर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो! अनेकांच्या भुवया उंचावल्या; मनसे म्हणते, 'भावनेच्या...'

Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: "माझा फोटो वापरायचा नाही" असं बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर सांगितलं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 27, 2025, 01:31 PM IST
मनसेच्या बॅनरवर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो! अनेकांच्या भुवया उंचावल्या; मनसे म्हणते, 'भावनेच्या...'
शिवाजीपार्कमध्ये रविवारी होणार गुढीपाडवा मेळावा

Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असतानाच मनसेच्या एका बॅनरने सर्वाचेचं लक्ष वेधून घेतले आहे. मनसेच्या गुढीपाडावा मेळाव्याच्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो झळकला आहे. बाळासाहेबांबरोबरच प्रबोधनकार ठाकरेंसहीत राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचाही फोटो या बॅनरवर आहे. मनसेच्या बॅनरवर अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

बाळासाहेब म्हणालेले, "माझा फोटो वापरायचा नाही"

शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी, "माझा फोटो वापरायचा नाही", असे सांगितल्यानंतर आतापर्यंत मनसेने बाळासाहेबांचा फोटो वापरला नव्हता. मात्र आता मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कात लागलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार यांचे फोटो लावण्यात आले आहेत. 

...म्हणून शिंदेंही वापरतात बाळासाहेबांचा फोटो

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीत राज्य सरकारने समाविष्ट केले आहे. त्यामुळं त्यांचा फोटो कुणालाही वापरता येवू शकतो, असा युक्तीवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकताच केला होता. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षात फूट पडल्यानंतरपासून सातत्याने बाळासाहेबांचा फोटो वापरत आले आहेत. एकनाथ शिंदेंसहीत त्यांचा पक्ष बाळासाहेबांचा फोटो वापरतो. आता बाळासाहेबांचा फोटो वापरणाऱ्या पक्षांमध्ये आता मनसेचीही भर पडली. त्यामुळे आता तीन पक्ष बाळासाहेबांचे फोटो वापरू लागले आहेत. 

उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंना पत्रकारपरिषदेमध्ये मनसेनं बाळासाहेबांचा फोटो वापरल्यासंदर्भात विचारण्यात आलं. यावर उद्धव ठाकरेंनी, "आता सगळ्यांना कळतंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आता सगळेच पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरत आहेत. त्यांना कळलं आहे की याशिवाय आता पर्याय नाही," अशी प्रतिक्रिया नोंदवली.

मनसे बॅनर्स काढणार

दरम्यान, मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी या बॅनरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. "ज्याने बॅनर लावला तो पक्षाचा सुरुवातीपासूनच कार्यकर्ता आहे. भावनेच्याभरात त्याने हे बॅनर्स लावले. बॅनर्स काढण्यात येतील," असं किल्लेदार यांनी म्हटलं आहे. तसेच, "सध्या या बॅनर्सची फक्त मिडिया मध्ये चर्चा सुरू आहे. "ज्या तरुण कार्यकर्त्याने ही बॅनर लावले त्याच्याशी मी बोललो. संदीप देशपांडे आणि इतर नेत्यांनी देखील त्याच्याशी संवाद साधला आहे. हे बॅनर काढले जातील," असं किल्लेदार यांनी स्पष्ट केलं आहे. मुनाफ ठाकूर नावाच्या कार्यकर्त्याने हे बॅनर्स लावले होते. 

राज ठाकरेंनी शिवसेना कधी सोडली?

राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर 2005 रोजी शिवसेनेचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तेव्हाच नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याचा त्यांचा इरादा जाहीर केला. 9 मार्च 2006 रोजी मुंबईत ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी कधीच बाळासाहेबांचा फोटो पोस्टर अथवा बॅनर्सवर वापरलेला नाही.