'आमचा गणेशोत्सव...', छटपुजेचा उल्लेख करत परप्रांतीयांवर राज ठाकरेंचा कटाक्ष, म्हणाले 'महाराष्ट्रात येऊन...'

Raj Thackeray News : शिवसेनेच्या उबाठा पक्षासोबत युती करत मनपा निवडणुकांना सामोरं जाणाऱ्या राज ठाकरे यांनी त्यांची ठाम मतं झी 24तासला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट मांडली. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे चौफेर फटकेबाजी केली...   

सायली पाटील | Updated: Jan 10, 2026, 02:16 PM IST
'आमचा गणेशोत्सव...', छटपुजेचा उल्लेख करत परप्रांतीयांवर राज ठाकरेंचा कटाक्ष, म्हणाले 'महाराष्ट्रात येऊन...'
Raj Thackeray mns chief in To The Point With Kamlesh Sutar podcast mumbai ganeshotsav ganpati visarjan and chhathpuja bmc election 2026

Raj Thackeray News : (BMC Election 2026) मनपा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच आता खुद्द राज ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात मराठी माणसाची बाजू उचलून धरत राज ठाकरे यांनी नुकतंच झी 24तासशी संवाद साधलाना मुलाखतपर कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. कठोर शब्दांमध्ये त्यांनी मराठी तरुणाईपुढं असणाऱ्या नोकऱ्यांच्या प्रश्नापासून ते थेट छठपुजेच्या निमित्तानं समुद्रकिनारी होणाऱ्या शक्तीप्रदर्शनावर कटाक्ष टाकला. 

Add Zee News as a Preferred Source

छटपूजेसह कावड यात्रेवरुनही राज ठाकरेंचा हल्लाबोल!

झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे छठपुजेवरुन पुन्हा एकदा कडाडले. महाराष्ट्रात छटपुजा होऊ देणार नाही असा सज्जड इशाराच त्यांनी दिला. 'कोणता उत्तर प्रदेश दिन?' असा सवाल विचारत त्यांनी महाराष्ट्रात छटपुजेच्या निमित्तानं सुरु असलेल्या शक्तीप्रदर्शनाला विरोध केला. छटपूजेसह कावड यात्रेवरुनही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. 

काही वर्षे मागे जात थेट 2008 चा उल्लेख ठाकरेंनी केला. '2008 ला उत्तर प्रदेश दिन समोर आला, कोणता उत्तर प्रदेश दिन? आता महाराष्ट्र दिन... त्याला एक कारण आहे ना. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, राज्याची स्थापना होती. उत्तर प्रदेश दिन जो उत्तर प्रदेशातही साजरा होत नाही, ते फॅड तुम्ही महाराष्ट्रात आणू पाहताय? त्याला विरोध करताच ते बंद झालं. आता हे छटपुजेच्या नावाखाली चौपाट्या भरून टाकतात, काय सांगायचंय? कोणाला ताकद दाखवताय?', असा खडा सवाल त्यांनी दिला.  

पुन्हा भाजपवाल्यांनी छटपूजेची सुरुवात केलीये...

गेल्या तीनचार वर्षात पुन्हा भाजपवाल्यांनी छटपूजेची सुरुवात केलीये असं म्हणताना, 'इथे महाराष्ट्रात येऊन मला ताकद दाखवू नका, पुजेला माझा विरोध नाही घरात करा जी पूजा करायचीये ती. आमच्याकडे जो गणपती विसर्जनाचा सोहळा होतो तो वर्षानुवर्षांपासून होतोय. ते होतं म्हणून समुद्रावर आम्ही ताकद दाखवायला जातो, असं असेल तर या भानगडीत पडू नका! माझा कोणत्याही पुजेला विरोध नाही, मात्र त्याच्यामार्फत जर महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाला ताकद दाखवत असाल तर मात्र त्याला माझा विरोध राहणारच आहे', असा सज्जड दम त्यांनी भरला.  

हल्ली वाढणाऱ्या कावड यात्राबाबत बोलताना 'मुली नाचवतात, डिजे लावतात. काय चाललंय? कोणता धर्म हा? या सगळ्या लोकांचं काय षडयंत्र सुरुय?' अशा शब्दांत तत्सम कार्यक्रमांना वाव देणाऱ्यांचे ठाकरेंनी कान टोचले. लाचारीनं, राजकीय स्वार्थासाठी आपल्याकडची लोकं याला शरण जातायत, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत 'भाजप हा एक भान सुटलेला पक्ष आहे', इतकंच काय, तर शिंदेसेनेचंही भान सुटलंय आणि ते सत्तेसाठी लाचार झालेयत अशी टीकेची झोड त्यांनी उठवली. 'जिथं मतं, पैसा आणि सत्ता मिळेल ते सगळं करा. ही युपी-बिहारची संस्कृती आपण महाराष्ट्पात घुसवू पाहतोय. आपण महाराष्ट्र म्हणून त्यांना सुधरवायचं, की त्यांनी तिथून येऊन आम्हाला बिघडवायचं? महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणानं आणि तरुणीनं याचा विचार केला पाहिजे', असा इशारा त्यांनी दिला. 'तिथं महाराष्ट्र जातीमध्ये पेटलाय, इथं बाहेरून लोक येऊन तुमचं अस्तित्वं मिटवून टाकतायत, सगळीकडून धुळधाण करायची आणि यांना हवीय फक्त सत्ता', असे ताशेरे ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर आणि सध्याच्या राज्यकर्त्यांवर ओढले. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More