येत्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार! राज ठाकरे म्हणाले रणनिती जाहीर करणार

मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित करुन मतदान यंत्रणेलाच आरोपीच्या पिंज-यात उभं केलंय. विरोधकांच्या आरोपांना निवडणूक आयोग कसं सामोरं जातंय, निवडणूक आयोग विरोधकांचे आरोप खोडून काढण्यासाठी कोणती रणनिती अवलंबणार याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

वनिता कांबळे | Updated: Oct 15, 2025, 10:50 PM IST
 येत्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार! राज ठाकरे म्हणाले रणनिती जाहीर करणार

Raj Thackeray To Join MVA : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं मतदार यादी निश्चित केली आहे. मात्र, त्या यादीवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतलेत. मतदार याद्यांमधील घोळाबाबत विरोधकांनी काही पुरावे निवडणूक आयोगाला सादर केले. त्यावर निवडणूक आयोगानं मतदार याद्यांवर आक्षेप नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांना अवघ्या 8 दिवसांची मुदत दिलीय. आयोगाच्या या कृतीवर राज ठाकरे नाराज झालेत. जर निवडणूक आयोगानं ते नोटीफिकेशन मागं घेतलं नाहीतर दोन दिवसांत विरोधक यावर काय करणार त्याची रणनिती जाहीर करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले. 

Add Zee News as a Preferred Source

राज ठाकरेंच्या भूमिकेशी उद्धव ठाकरेंनीही सहमती दर्शवली. निवडणूक आयोगानं अनेक मतदारांची नावं डिलीट केली. काही बोगस मतदारांची नावं यादीत समाविष्ट केली. हा सगळा प्रकार म्हणजे मतवध असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना विरोधकांनी मतदार यांद्यांमधील घोळाचा मुद्दा उपस्थित केला. निवडणुकीसाठी मतदार याद्यांची दुरुस्ती करा अशी मागणी विरोधकांनी केली. राज ठाकरेंनी तर वडिलांपेक्षा वयस्कर असलेल्या सव्वाशे वर्षांच्या मतदारांची यादी वाचून दाखवली. एकाच पत्त्यांवर शेकडोच्या संख्येनं नोंद झालेल्या मतदारांची तर विरोधी पक्षांनी यादीच वाचून दाखवली. 

राज ठाकरेंनी मतदार यादीत कसे घोळ आहेत याचा सांगितलेला हा अफलातून नमुना. विरोधकांनी मतदार याद्यांमधील वेगवेगळ्या पातळ्यांवर झालेले वेगवेगळे घोळ सांगण्यासाठी पुराव्यांसह निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. यावेळी मतदार नोंदणीत किती गफलती होतात याचा नमुनाच राज ठाकरेंनी सादर केला. कांदिवलीतले दोन मतदार चक्क सव्वाशे वर्ष वयाचे असल्याचं त्यांनी सांगितलं. याहून कमाल म्हणजे सव्वाशे वयाच्या मतदारांच्या वडिलांचं वय अवघं चाळीशीच्या घरात होतं. राज ठाकरेंनी यावर जी कोटी केली त्यामुळं पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

उद्धव ठाकरेंनीही खास त्यांच्या स्टाईलने निवडणूक आयोगाला टोमणे लगावले. महाराष्ट्रात दिर्घायुषी मतदार आहेत म्हणजे जगातलं सर्वात चांगलं वातावरण महाराष्ट्रात आहेत का असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी नालासोपा-यातील सुषमा गुप्ता यांचं नाव सहा वेळा मतदार यादीत नोंदवलं गेल्याचा दावा जयंत पाटलांनी केला. जेव्हा माध्यमांमध्ये याबाबत बातम्या आल्या तेव्हा अवघ्या काही तासांत सुषमा गुप्ता यांचं नाव डिलीट करण्यात आल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय. निवडणूक आयोगाचं सर्व्हर दुसराच कोणी व्यक्ती चालवतो का असा संशय त्यांनी व्यक्त केलाय. हे आरोप एवढ्यावरच थांबले नाहीत. तर राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच पत्त्यावर शंभर दोनशेच्या पटीत मतदारांची नोंद झाल्याचा मुद्दाही विरोधकांनी उपस्थित केला.. राज्यातल्या अनेक शहरांमधील मतदार नोंदणीची यादीच जयंत पाटलांनी वाचून दाखवली. मतदार यादी सुधारणांचा मुद्दा हा कोणत्याही पक्षाचा मुद्दा नाही त्यामुळं विरोधकांसोबत सत्ताधारी निवडणूक आयुक्तांच्या भेटीला का आले नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मतदार याद्यांमधील दोष काढून टाकायलाच हवेत अशी भूमिका मांडली.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More