रन्या राव प्रकरणात ट्वीस्ट, पतीने केला सर्वात मोठा खुलासा!

Ranya Rao Gold Smuggling Case:  सोने तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेत्री रन्या रावच्या पतीने त्यांच्या वैवाहीक नात्यासंदर्भात मोठा खुलासा केलाय. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 17, 2025, 06:24 PM IST
रन्या राव प्रकरणात ट्वीस्ट, पतीने केला सर्वात मोठा खुलासा!
रन्या राव

Ranya Rao Gold Smuggling Case: सोने तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेत्री रन्या राव केससंदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. अभिनेत्री रन्या रावला सोन्याची तस्करी करत असताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. बंगळुरुमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली रन्याला अटक केली. आता रन्याच्या पतीने त्यांच्या वैवाहीक नात्यासंदर्भात मोठा खुलासा केलाय. 

कोण आहे रन्या राव?

रन्या राव ही वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आल्यावर 14.2 किलो वजनाच्या 14.56 कोटी रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना तिला पकडण्यात आलं. ती सध्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) कोठडीत आहे. 2014 मधे मानिक्य चित्रपटातून पदार्पण करणारी रन्या राव 15 दिवसांत चौथ्यांदा दुबईला गेल्यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांच्या रडारखाली आली. वर्षभरात तिने दुबईचा 27 वेळा दौरा केला. पकडलं जाऊ नये म्हणून तिने काही सोने परिधान केले आणि बाकीचे कपड्यांमध्ये लपवले. अटक केल्यानंतर, तपासकर्त्यांनी तिच्या घरावर छापा टाकला आणि 2 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. 

राव यांनी नाकारला सहभाग 

आयपीएस रामचंद्र राव यांनी गुन्ह्यात आपला सहभाग नाकारला आहे. 'माझ्या सावत्र मुलीला तस्करीच्या आरोपाखाली अटक झाल्याच्या बातमीने धक्का बसला आहे. 4 महिन्यांपूर्वी मुलीचं लग्न झाल्यापासून आपण तिच्या संपर्कात नव्हतो. तिला आणि तिचा पती जतीन हुक्केरी यांच्या व्यावसायिक व्यवहाराबाबतही अनभिज्ञ असल्याचं' त्यांनी सांगितलं होतं.

पतीकडून अटकेपासून संरक्षणाची मागणी 

सोने तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या रन्या रावचा पती जतिन हुक्केरीने अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलीय. पुढच्या सुनावणीपर्यंत जतिन हुक्केरीविरोधात कारवाई न करण्याचे निर्देश कर्नाटक हायकोर्टने दिले होते. हुक्केरीचे वकील प्रभुलिंग नवदगीने कोर्टात अटकेपासून संरक्षणाची मागणी केली. 

काय म्हणाले जतिनचे वकील?

जतिनने नोव्हेंबरमध्ये रन्या रावशी विवाह केला होता. पण डिसेंबरमध्ये काही कारणांमध्ये ते अनौपचारिकपणे वेगळे झाले, असे जतिनच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. डीआरआयचे वकील मधू राव हे यावर सोमवारी आपला आक्षेप नोंदवणार आहेत.