जालना: येत्या काळात मुख्यमंत्रिपदाबाबत विचार करणार असल्याचे सूचक वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. जालना येथे विविध महामंडळांवर नियुक्त झालेल्या सदस्यांचा ओबीसी समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी एका समर्थकाने सत्कार समारंभात जालन्याचा मुख्यमंत्री हवा आहे, अशी मागणी केली. तेव्हा पुढच्या काळात मुख्यमंत्री पदाचे बघू, असे दानवे यांनी म्हटले. सरपंचापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळी पदे भोगून झाली. आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही असेही दानवे म्हणाले. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत पुढे विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच रावसाहेब दानवे यांनी भाजपची तुलना वॉशिंग मशीनशी केली होती. त्यांनी म्हटले आहे की, आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. बाहेरून एखादा आमदार आला की, आम्ही त्याला या वॉशिंग मशीनमध्ये टाकतो. त्याला स्वच्छ धुतो आणि मग आमच्या लाईनीत उभं करतो. या वॉशिंग मशीनमध्ये गुजरातची निरमा पावडर वापरली जाते. त्यामुळेच तो माणूस स्वच्छ होतो आणि आपल्यात येतो, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते.
'मी पुन्हा येईन'; मुख्यमंत्र्यांना विश्वास
दरम्यान, दानवे यांनी राज्यात १३ सप्टेंबरपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याचेही सांगितले. साधारण १५ ऑक्टोबरच्या आसपास मतदानप्रक्रिया पार पडेल. यानंतर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे.