)
निलेश खरमरे (प्रतिनिधी) पुणे : रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातला आरोप-प्रत्यारोपाचा सामना अजूनही सुरूच आहे. धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहोळांवर नवा आरोप केलाय. तर धंगेकरांच्या आरोपांना मोहोळ यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलंय.
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे रोज नवनवीन आरोपांचे बॉम्ब फोडतायत. पुन्हा एकदा गंभीर आरोप करत धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर शरसंधान साधलंय. मुरलीधर मोहोळांनी महापौरपदाचा अपमान केलाय. महापौर असताना त्यांनी एका बिल्डरची कार वापरल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय. त्यामुळे धंगेकर विरूद्ध मुरलीधर मोहोळ वादाचा नवा अंका सुरू झालाय.
मुरलीधर मोहोळ यांचा जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले आहेत. मुरलीधर मोहोळ महापौर असताना ते पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे. ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचं शासकीय वाहन. ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची. हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर आहेत.
या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौरपदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले? असा सवालही धंगेकर यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून केलाय. मुरलीधर मोहोळांमागे लागलेलं आरोपांचं ग्रहण सुटण्याचं नाव घेत नाहीये. आधी जैन बोर्डिग आणि आता बिल्डरच्या कारवरून त्यांना पुन्हा कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न धंगेकरांनी केलाय. तर धंगेकरांच्या आरोपांना मुरलीधर मोहोळांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय.
जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावरूनही मोहोळांवर धंगेकरांनी आरोपांची मालिका सुरूच ठेवलीय. मंत्रिपदाचा गैरवापर करून मोहोळांनी जमीन हडपल्याचा आरोप पुन्हा एकदा धंगेकरांनी केलाय. धंगेकरांच्या आरोपांनंतर मुरलीधर मोहोळांनी देखील धंगेकरांवर कोथरूडमधील एक जमीन हडपल्याचा गंभीर आरोप केलाय.
धंगेकर आणि मोहोळांमध्ये सुरू असलेल्या वादावरून मराठा आंदोलक रमेश पाटलांनी धंगेकरांना फोन केला. तुम्ही जे काम करतायत ते काम चंद्रकांत पाटलांनी करायला हवं असं रमेश पाटलांनी धंगेकरांना फोनवरून सांगितलं. यानंतर धंगेकरांनी दिलेल्या प्रतिक्रियेची देखील चांगलीच चर्चा सुरू आहे. रवींद्र धंगेकरांच्या आरोपांनंतर वादांचं मोहोळ उठलंय. धंगेकरांच्या आरोपांना मुरलीधर मोहोळांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे या दोघांमधला वाद इथेच न थांबता आणखीन वाढण्याची शक्यता आहे.