RBI आणतंय 20 रुपयांची नवी नोट, कशी असेल डिझाइन, जुन्या नोटेचं काय करायचं? जाणून घ्या!

RBI New Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 20 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: May 18, 2025, 06:02 PM IST
RBI आणतंय 20 रुपयांची नवी नोट, कशी असेल डिझाइन, जुन्या नोटेचं काय करायचं? जाणून घ्या!
आरबीआय

RBI New Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 20 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. शनिवारी याबाबत माहिती देण्यात आली. नवीन नोटेवर राज्यपाल संजय मल्होत्रा ​​यांची सही असेल, असे यात म्हटले आहे. या नोटांची रचना महात्मा गांधी नवीन सीरिजतील 20 रुपयांच्या नोटांसारखीच असेल.

यासोबतच आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 20 रुपयांची नवीन नोट जारी झाल्यानंतर जुन्या नोटा चलनात राहतील, असेही आरबीआयने स्पष्ट केलंय. याचा अर्थ ज्या नोटा आधीच चलनात होत्या, त्या बंद केल्या जाणार नाहीत. 20 रुपयांच्या नवीन नोटा चलनात समाविष्ट केल्या जातील. जुन्या नोटांच्या चलनावर कोणतेही बंधन राहणार नाही, असेही पुढे सांगण्यात आलंय.

नवीन नोटेची रचना कशी असेल?

नवीन नोटेची रचना सध्याच्या नोटेपेक्षा थोडी वेगळी असू शकते; तुम्हाला त्यात काही नवीन वैशिष्ट्ये आणि रंग दिसू शकतात. नोटमध्ये महात्मा गांधींचे चित्र पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे दिसेल. वॉटरमार्क, सुरक्षा धागा आणि नंबर पॅटर्न आणखी मजबूत केले जातील, अशी माहिती समोर येतेय. 

नवीन नोटा का आणल्या जातायत?

चलन सुरक्षित ठेवणे आणि कोणालाही फसवणूकीचा सामना करावा लागू नये याची खात्री करणे हे रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट आहे. तसेच बनावट नोटांपासून स्वतःचे रक्षण करण्याचे आवाहन आरबीआय सतत करत असते. यासाठी आरबीआय वेळोवेळी नवीन नोटा जारी करते. तसेच नवीन गव्हर्नरची नियुक्ती झाल्यानंतरही त्यांच्या स्वाक्षरीने नोटा जारी केल्या जातात.

जुन्या नोटा बदलून घ्याव्या लागतील का?

तुमच्याकडे 20 रुपयांची जुनी नोट असेल तर ती बदलायची का? असा प्रश्न पडलाय तर काळजी करु नका. कारण तुम्हाला जुन्या नोटा बदलण्याची गरज भासणार नाही. तसेच त्या बँकांमध्ये जमा कराव्या लागणार नाहीत. जेव्हा नवीन नोटा जारी केल्या जातील तेव्हा तुम्ही नवीन आणि जुन्या आणि नव्या अशा दोन्ही नोटा वापरू शकाल. नवीन नोटा तुमच्यापर्यंत बँका आणि एटीएमद्वारे पोहोचतील. एकंदरीत आरबीआयने 20 रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्यानंतर जुन्या २० रुपयांच्या नोटा बंद केल्या जाणार नाहीत किंवा त्या कुठेही जमा करण्याची आवश्यकता भासणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलंय.