कोल्हापुरात गोकुळवरील मोर्चात अभूतपूर्व राडा, गाई-म्हशी गेट तोडून आत नेण्याचा प्रयत्न

कर्ज रोख्यांच्या मुद्यावरून कोल्हापूरच्या गोकुळ दुध संघाविरोधात जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आंदोलक आणि पोलिसांची जोरदार झटापट झाली.  

शिवराज यादव | Updated: Oct 16, 2025, 08:46 PM IST
कोल्हापुरात गोकुळवरील मोर्चात अभूतपूर्व राडा, गाई-म्हशी गेट तोडून आत नेण्याचा प्रयत्न

कर्ज रोख्यांच्या मुद्यावरून कोल्हापूरच्या गोकुळ दुध संघाविरोधात जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आंदोलक आणि पोलिसांची जोरदार झटापट झाली. आंदोलकांनी मोर्चात जनावरे आणल्याने पोलिसांकडून जनावरे हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि त्यानंतर अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे गोकुळ दूध संघातील राजकारण यापुढे जोरदार तापणार याची झलक आज पाहायला मिळाली.
  
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क ऑफिस समोर झालेला हा राडा.. दूध संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादकानी कर्जरोखा रक्कम परत मिळावी यासाठी केलेलं हे आंदोलन.यावेळी आंदोलकांनी आपल्यासोबत आणलेल्या गाई म्हशी गेट तोडून आत नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि दूध संस्था प्रतिनिधीमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. यामुळे ताराबाई पार्कमधील गोकुळच्या ऑफिस समोर जोरदार राडा झाला.

Add Zee News as a Preferred Source

गोकुळने कर्जरोखा रक्कम तब्बल 40 टक्के कपात केल्यानंतर गोकुळ दूध संघाशी संलग्न असणाऱ्या  संस्था आणि दूध उत्पादकामध्ये संतापाची लाट उसळली.  दरवर्षी 10 ते 15 टक्के रक्कम कपात होत असताना यंदा 40 टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम संस्था चालकांच्या तिजोरीवर पडला. 

गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी समर्थन देत आजच्या मोर्चाचे नेतृत्व केले... शौमिका महाडिक यांनी संस्थाचालकांची भूमिका लावून धरत कर्जरोखा रक्कम काही केल्या परत मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली. 

गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी या मोर्चानंतर गोकुळच्या व्यवस्थापकीय संचालक आणि विद्यमान संचालिका यांची भेट घेतली. त्यावेळी डिबेंचरच्या संदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत दूध उत्पादकांसाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दिलंय.  

गोकुळमध्ये सध्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलची सत्ता आहे. पण मध्यंतरी गोकुळचे अध्यक्ष निवडीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून गोकुळ मध्ये महायुतीचाच अध्यक्ष  व्हावी अशी भूमिका घेतली. त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली. त्या निवडीनंतर गोकुळवर महायुतीची सत्ता आल्याचा दावा करण्यात आला. पण दुसरीकडे मात्र गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी कर्जरोख्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं आहे.  त्यामुळे आगामी गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी विरोधात गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक या अशाच पद्धतीने मोठं रान  उठवतील असं  सध्या तरी दिसत आहे. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More