'उद्धव- राज यांच्या एकीच्या प्रयोगाने पुन्हा बाळासाहेबांचे स्वप्न साकार'

Balasaheb Thackeray:  हिंदू पंडितांचे एकमेव तारणहार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे हिंदू पंडितांचे चिलखत होते, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 17, 2025, 07:26 AM IST
'उद्धव- राज यांच्या एकीच्या प्रयोगाने पुन्हा बाळासाहेबांचे स्वप्न साकार'
Saamana Agralekh On balasaheb thackeray death anniversary and upcoming election

Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी सामना अग्रलेखात मराठी माणूस आणि मराठी भाषा यावर भाष्य करण्यात आलं आहे. 'महाराष्ट्रात मराठी माणसाच्या राजकारणाची शोकांतिका करण्याचे प्रयत्न हर तऱ्हेने केले जात आहेत. मात्र उद्धव आणि राज यांच्या एकीच्या प्रयोगाने पुन्हा एकदा बाळासाहेबांचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. शिवतीर्थावर विसावलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाला 'एकी'चा संदेश दिला. ती एकी हीच हिंदुहृदयसम्राटांना खरी मानवंदना ठरेल,' असं  सामनात म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र सर्वांची नजर ही मुंबई महानगरपालिकेवर आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. आजच्या सामना अग्रलेखात याच धागा पकडत भाजपवर टीका करण्यात आली आहे. 

'मुंबई-महाराष्ट्रात मराठी एकजुटीचाच विजय होईल. बाळासाहेब ठाकरे हे भारतीय राजकारणातले असामान्य पुरुष होते. या पुरुष सिंहाने देशाच्या राजकारणातले महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी माणूस हा जगात कोठेही गेला तरी 'मराठी' म्हणून त्याच्यातला आत्मविश्वास बाळासाहेब ठाकरे यांनी जागा केला. त्याच मराठी माणसाला बाळासाहेब आज विचारीत आहेत, "जय महाराष्ट्र! मराठी माणसा, जागा आहेस ना? झोपलास तर संपलास! जागा रहा!",' असं सामनात म्हणण्यात आलं आहे. 

'भारतात एकंदरीत जे अराजक माजले आहे ते पाहता देशाच्या कोट्यवधी जनतेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण रोजच येत आहे. बिहारच्या विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो जिता वोही सिकंदर." आज बाळासाहेब असते तर त्यांनी "कोण हा सिकंदर ? तो नव्या हिंदुत्ववाल्यांचा नवा बाप आहे काय? महाराष्ट्राचा, देशाचा बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सिकंदर फार तर भाजपचा बाप असेल," अशा शब्दांत खिल्ली उडवली असती.'

'या महाराष्ट्राने देशाला लढायला शिकवले तोच महाराष्ट्र आज सुरतप्रमाणे लुटला जात आहे व स्वतःस मराठी म्हणवून घेणारे लाचार अंधभक्त मोदी-शहा-अदानीचे भजन करीत आहेत. आज बाळासाहेब असते तर या सगळ्यांच्या पाठीत हंटरचे फटके बसले असते. देशात न्यायालये, लोकशाही, निवडणूक म्हणजे एक तमाशा बनला आहे. लोकशाहीत जनादेशाला महत्त्व आहे. आज फक्त निवडणूक आयोगाच्या आदेशाने जय-विजय, पराजय ठरतात. देशातील विरोधकांचे सर्व आवाज दडपले जात असताना जनतेला एकच आवाज आठवतोय तो म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. त्यांनी कधी तमाम हिंदूंना साद घातली, तर कधी शिवतीर्थावरून तमाम मराठी माणसाला साद घालून एकत्र केले,' 

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More