नांदेडमध्ये उडता पंजाब, औषधांच्या दुकानात नशेच्या गोळ्यांची विक्री

नांदेड शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत आहेत. पण याच तरुणाईला लक्ष्य केलं जातंय. काही समाजविघातक त्यांना नशेच्या आहारी नेत असल्याचा धक्कादायक खुलासा नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केलाय. 

पुजा पवार | Updated: Jun 21, 2025, 09:23 PM IST
नांदेडमध्ये उडता पंजाब, औषधांच्या दुकानात नशेच्या गोळ्यांची विक्री
(Photo Credit : Social Media)

सतीश मोहिते (प्रतिनिधी) नांदेड : औषधी दुकानावर नशेच्या गोळ्या मिळत असल्याचा धक्कादायक खुलासा एका खासदारानं चक्क जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. या गंभीर प्रकाराची दखल घेत पालकमंत्र्यांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस तसंच अन्न आणि औषध प्रशासनाला दिल्यात. 

नांदेड शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत आहेत. पण याच तरुणाईला लक्ष्य केलं जातंय. काही समाजविघातक त्यांना नशेच्या आहारी नेत असल्याचा धक्कादायक खुलासा नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केलाय. नांदेड शहरातल्या औषधांच्या दुकानात नशेच्या गोळ्या विकल्या जातात. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा :  रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप; भास्कर जाधवांनी भरत गोगवलेंची लाज काढली

खासदार चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर पालकमंत्री अतुल सावेंनी गांभीर्यानं दखल घेतली. ह्या गोळ्यावर बंदी नाही पण डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशा गोळ्या विकणा-या औषधांच्या दुकानावर कारवाई करू, असा इशारा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिलाय.

तारूण्याच्या उंबरठ्यावर चुकीच्या संगतीमुळे अनेकजण नशेच्या विळख्यात सापडतात. औषधी गोळ्या, कफसिरप, व्हाईटनर अश्या विविध गोष्टींचा वापर स्वस्तातल्या नशेसाठी केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा सजग राहावं, अशा वाईट गोष्टींना बळी पडू नये. तसंच पालकांनीही आपल्या पाल्यांकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.