संभाजी भिडेंना चावा घेतला 'त्या' कुत्र्याबाबत धक्कादायक माहिती उघड; स्थानिकांनी सांगितले सहा महिन्यात...

सांगलीमध्ये संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्याची घटना घडल्यानंतर सांगली पालिका आता अॅक्शन मोडवर आली आहे. शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरु केली आहे.

वनिता कांबळे | Updated: Apr 15, 2025, 06:59 PM IST
संभाजी भिडेंना चावा घेतला 'त्या' कुत्र्याबाबत धक्कादायक माहिती उघड; स्थानिकांनी सांगितले सहा महिन्यात...

Sambhaji Bhide Guruji: भटक्या कुत्र्यांच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर झालाय. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेच्या संभाजी भिडेंवर कुत्र्यानं हल्ला केलाय. सांगलीतल्या माळी गल्लीत संभाजी भिडे एका धारक-याच्या घरी जेवायला गेले होते. जेवून निघताना परिसरातल्या भडक्या कुत्र्यानं त्यांच्या पायाला चावा घेतला. माळी गल्ली परिसरात यापूर्वीही भटक्या कुत्र्य़ांनी अनेकांना चावा घेतला होता. तेव्हाच कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर झोपी गेलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आलीय. सांगली महापालिकेनं भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरु केल्याचा दावा केलाय. जी मोहीम सुरु केलीय त्याची जबाबदारीही महापालिकेनं बहुतेक सांगलीकरांवरच टाकलीये. कारण भटकी कुत्री कुठं आहेत हे शोधण्याची जबाबदारी महापालिकेनं सांगलीकरांवर टाकली आहे. 

हे देखील वाचा... रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन वाद; संभाजी भिडेंनी सांगितली वाघ्या कुत्र्याची कथा

तर ज्या माळी गल्ली परिसरामध्ये संभाजी भिडेंना कुत्र्यांना चावलं,त्याच ठिकाणी गेल्या सहा महिन्यांमध्ये चार जणांना त्याच कुत्र्याने चावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  त्यामुळे तेथील नागरिकांकडून देखील भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.तर ज्या कुत्र्याने संभाजी भिडेंना चावलं त्या कुत्र्याचा शोध पालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून घेण्यात आला, मात्र ते कुत्र सापडलं नाही.

संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्यानं हल्ला केल्यानंतर महापालिकेला कुत्रे पकडण्याची मोहीम सुरु करण्याची बुद्धी सूचलीये. उशिरा जाग आलेली असतानाही त्यातही सरकारी छाप काम सुरु असल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संभाजी भिडे त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांचा दैनंदिन कार्यक्रम देखील सुरू आहे. कुत्र्यांनी घेतलेला चावा हा किरकोळ स्वरूपाचा आहे. भिडे यांच्यावर रात्री उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे घाबरण्याचे गरज नसून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असा आवाहन शिवप्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.