जलील यांच्याविरोधात उद्रेक, आंबेडकरी अनुयायांनी काढला विराट मोर्चा

Sambhajinagar News: संजय शिरसाठ यांच्यावर आरोप करताना इम्तियाज जलील यांनी आंबेडकरी जनतेबाबत आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप आहे. तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी पैसे देऊन हा मोर्चा काढला असा टोला इम्तियाज जलील यांनी या मोर्चावर केलाय.

पुजा पवार | Updated: Jun 23, 2025, 10:23 PM IST
जलील यांच्याविरोधात उद्रेक, आंबेडकरी अनुयायांनी काढला विराट मोर्चा
(Photo Credit : Social Media)

विशाल करोळे (प्रतिनिधी) संभाजीनगर : Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर मध्ये आज इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी विराट मोर्चा काढला. इम्तियाज जलील यांना अटक करा त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. संजय शिरसाठ यांच्यावर आरोप करताना इम्तियाज जलील यांनी आंबेडकरी जनतेबाबत आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप आहे. तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी पैसे देऊन हा मोर्चा काढला असा टोला इम्तियाज जलील यांनी या मोर्चावर केलाय.

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातल्या संघर्षानं आता रस्त्यावरच्या लढाईचं स्वरुप घेतलंय. इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी संजय शिरसाट समर्थक आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला. काही दिवसांपूर्वी शिरसाट यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करताना विशिष्ट जातीसमुहाचा अपमानास्पद उल्लेख केल्याचा आरोप शिरसाट समर्थकांनी केलाय. या प्रकरणी जलील यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जलील यांना अटक करावी यासाठी आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढला होता.

पोलिसांनी इम्तियाज जलील यांना अटक करावी अन्यथा जलील यांच्या घरात घुसण्यासही मागंपुढं पाहणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिलाय. आधीच्या वक्तव्यानं वाद ओढावलेला असतानाही जलील माघार घेण्यासाठी तयार नाहीत. जलील यांनी आंदोलकांवर पुन्हा आरोप केलेत.

मोर्चानंतरही आंबेडकरी अनुयायांचा संताप कमी झालेला नव्हता. पोलिसांनी कारवाई केली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. दुसरीकडं इम्तियाज जलील यांनीही यापुढच्या काळात शिरसाट आणि त्यांच्या समर्थकांचे घोटाळे बाहेर काढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळं हा संघर्ष आणखी गंभीर वळण घेणार असे संकेत आतापासूनच मिळू लागलेत.