सांगलीचा 'चंद्रहार' कोणाच्या गळाला? ठाकरेंना चितपट करत पैलवान शिंदेंच्या तालमीत सत्तेच्या जोरबैठका मारणार?

Sangli Chandrahar Patil: शिवसेनेचे सांगलीतले नेते चंद्रहार पाटील आणि  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीमागे नेमकं दडलंय काय आणि घडलंय काय? जाणून घेऊया. 

प्रविण दाभोळकर | Updated: Apr 26, 2025, 09:59 PM IST
सांगलीचा 'चंद्रहार' कोणाच्या गळाला? ठाकरेंना चितपट करत पैलवान शिंदेंच्या तालमीत सत्तेच्या जोरबैठका मारणार?
चंद्रहार पाटील

Sangli Chandrahar Patil: शिवसेनेचे सांगलीतले नेते चंद्रहार पाटील हे अचानक चर्चेत आहे. त्यासाठी कारण ठरलंय त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट.. या भेटीमागे नेमकं दडलंय काय आणि घडलंय काय?

सध्या कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत.. मात्र राज्याच्या राजकारणात लहानमोठ्या उलथापालथी सुरुच आहेत. त्याच एक घडामोड घडलीय. ज्या नेत्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट मित्रपक्ष काँग्रेसशी आणि महविकास आघाडीशी पंगा घेतला होता. त्याच सांगलीतल्या पैलवान चंद्रहार पाटील यांनी गुरुवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे कुटुंबासह सध्या परदेशात आहेत. 

तेव्हाच चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदेंच्या या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीच चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणल्याचं म्हटलं जातंय. याबाबत उदय सामंतांशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनीही याला दुजोरा दिलाय. त्यामुळं पैलवान चंद्रहार पाटील ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का अशीही चर्चा रंगलीय. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही बोलकी प्रतिक्रिया दिलीय. 

टीकेचे बाण सुरु झाल्यावर आणि पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्यावर लागलीच यावर चंद्रहार पाटील यांनी समाजमाध्यमांवर स्पष्टीकरण दिलंय. राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या हितशत्रूंनी पेरल्या. हितशत्रूंचा लवकरच बंदोबस्त केलेला पाहायला मिळेल, असं चंद्रहार पाटील म्हणालेत. डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गटात सध्या राज्य संघटक पदावर कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरोधात जात उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांसाठी खिंड लढवली होती.
 
लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेत कोल्हापूरच्या जागेऐवजी सांगलीच्या जागेवर दावा केला. ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी परस्पर घोषित करण्यात आली.  काँग्रेसच्या बंडखोर विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला. चंद्रहार पाटलांना हरवत विशाल पाटलांचा लोकसभेत विजय झाला. चंद्रहार पाटलांना लोकसभेत तिस-या क्रमांकाची मतं मिळाली. तरीही निवडणुकीनंतर शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांची राज्य संघटकपदी वर्णी लागली.

ऐन लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांशी पंगा घेतला. मात्र आता तेच चंद्रहार पाटील राजकीय आखाड्यात ठाकरेंवर डाव पलटवणार का याची चर्चा सुरू झालीय. ठाकरेंना चितपट करत डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील शिंदेंच्या तालमीत सत्तेच्या जोरबैठका मारणार का? हे आता काळच सांगेल.